Goa Election Update : मडगावतून दिगंबर कामत आघाडीवर | पुढारी

Goa Election Update : मडगावतून दिगंबर कामत आघाडीवर

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगाव मतदारसंघातून काँग्रेसचे दिगंबर कामत २८८८ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर भाजपचे बाबू आजगावकर ८८५ मते घेऊन पिछाडीवर आहेत. त्यांच्या मागोमाग आरजीचे लिकोलीन वाझ यांना पहिल्या फेरीत १४० मते प्राप्त झाली आहेत. तब्बल तीस वर्षे निवडणुकीत हॅट्टिक साधणारे दिगंबर कामत आताही आघाडीवर आहेत.

सावर्डेत गणेश गावकर आघाडीवर

सावर्डे मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार दीपक पावसकर यांना भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांनी १४०१ मतांनी मागे टाकले आहे. दीपक पावसकर हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारात बांधकाम मंत्री राहिले आहेत. भाजपने शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पावसकर यांना १०८९ एवढी मते प्राप्त झाली असून २४९० मते मिळवत भाजपचे गणेश गावकर आघाडीवर आहेत. काँग्रेसचे खेमलो सावंत ७८ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर आहेत तर अपक्ष उमेदवार आणि कुळेचे सरपंच गंगाराम लांबोर यांना ७१ मते मिळालेली आहेत.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना जबर धक्का बसण्याची शक्यता

केपे मतदारसंघात तीनवेळा जिंकून जिंकलेले भाजप सरकारातील उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. केपेचे एल्टन डिकॉस्टा यांच्यापासून ते सुमारे १४२२ मतांनी पिछाडीवर आहेत. बाबू कवळेकर यांना पहिल्या फेरीत ९८१ मते प्राप्त झाली आहे. तर काॅंग्रेसचे एल्टन यांना २४०३ मते मिळालेली आहेत. आपचे राहुल परेरा यांना ६३ तर रेवोल्युशनरी गोवंसचे विशाल गावस देसाई यांना ३५८ मते मिळालेली आहेत. पहिल्या फेरीतच बाबू कवळेकर पिछाडीवर गेल्याने काँग्रेस समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून भाजपमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. बाबू कवळेकर हे तीनवेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी राजकीय घडामोडीत त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. भाजप सरकारात ते उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री सुद्धा होते.

Back to top button