Goa Election : गोव्यात आज मतदान; ३०१ उमेदवार रिंगणात | पुढारी

Goa Election : गोव्यात आज मतदान; ३०१ उमेदवार रिंगणात

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात आज मतदान होत आहे. शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, आता उमेदवारांना होणार्‍या मतदानाच्या टक्केवारीची उत्सुकता लागून राहिली आहे. आज 301 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. गेल्या महिनाभरात प्रत्येक उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्याचे सर्वप्रकारे प्रयत्न केलेत. आता मतदारराजा कोणावर प्रसन्न होणार, हे आपल्याला 10 मार्चच्या निकालादिवशीच समजून येईल.

मतदार यादीत 30,599 नवी नावे समाविष्ट

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने 30 हजार 599 मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच विविध कारणास्तव 14 हजार 409 मतदारांची नावे यादीतून काढली आहेत. यामुळे आता मतदार यादीत 11 लाख 56 हजार 464 मतदार आहेत. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये एक लाख 14 हजार 274 मतदार यादीमध्ये होते. राज्य मतदार अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 19 वयोगटातील 26 हजार 297 मतदार आहेत. 20 ते 29 वयोगटातील एक लाख 99 हजार 958 आणि 30 ते 39 वयोगटातील दोन लाख 22 हजार 614 मतदार आहेत. 40 ते 49 वयोगटातील दोन लाख 52 हजार 463, 50 ते 59 वयोगटातील दोन लाख आठ हजार 61, 60 ते 69 वयोगटातील एक लाख 37 हजार 64, सत्तर ते 79 वयोगटातील 79 हजार 969 मतदार आहेत. 80 वर्षांवरील तीस हजार 38 मतदार राज्यात आहेत.

मतदारसंघ व उमेदवार संख्या

 • मांद्रे 9
 • पेडणे 9
 • डिचोली 5
 • थिवी 7
 • म्हापसा 8
 • शिवोली 13
 • साळगाव 6
 • कळंगुट 7
 • पर्वरी 5
 • हळदोणे 6
 • पणजी 7
 • ताळगाव 8
 • सांताक्रूझ 5
 • सांतआंद्रे 7
 • कुंभारजुवे 7
 • मये 9
 • साखळी 12
 • पर्ये 7
 • वाळपई 8
 • प्रियोळ 8
 • फोंडा 7
 • शिरोडा 8
 • मडकई 8
 • मुरगाव 8
 • वास्को 9
 • दाबोळी 7
 • कुठ्ठाळी 9
 • नुवे 7
 • कुडतरी 8
 • फातोर्डा 6
 • मडगाव 5
 • बाणावली 5
 • नावेली 9
 • कुंकळ्ळी 10
 • वेळ्ळी 6
 • केपे 7
 • कुडचडे 6
 • सावर्डे 7
 • सांगे 8
 • काणकोण 8

उत्तर गोवा

पुरुष महिला एकूण
अंध 283 185 468
दिव्यांग 957 634 1591
कर्णबधिर 255 186 441

दक्षिण गोवा

पुरुष महिला एकूण
अंध 245 195 440
दिव्यांग 1203 703 1906
कर्णबधिर 305 242 547

कोणते आहेत बारा मतदारसंघ अतिसंवेदनशील

गोव्यामध्ये बारा मतदारसंघ असे आहेत जे अतिसंवेदनशीलमध्ये आहेत. देशांमध्ये ही सर्वात जास्त टक्केवारी आहे. एखाद्या मतदारसंघांमध्ये तीन व्यक्तीवर गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्यास तो मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार गोव्यात 12 मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे व्यक्ती असल्याचे असोल्डेकर यांनी सांगितले. ते मतदारसंघ असे : मांद्रे, मुरगाव, सावर्डे, पर्वरी, वाळपई, कळंगूट, पेडणे, शिवोली, नावेली, म्हापसा, कुंभारजुवे, साखळी

सर्वांत श्रीमंत दाम्पत्य

2022 च्या निवडणुकीत उतरलेले श्रीमंत उमेदवार याप्रमाणे, मायकल लोबो (काँग्रेस ) 93 कोटी. डिलायला लोबो ( काँग्रेस) 93 कोटी. बाबूश मोन्सेरात (भाजप) 48 कोटी,तर जेनिफर मोन्सेरात ( भाजप) 48 कोटी आहे. विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) 37 कोटी. दीपक ढवळीकर (मगो ) 32 कोटी. जनिता मडकईकर (भाजप) 32 कोटी,आंतोनिओ वाझ ( काँग्रेस ) 30 कोटी, निलेश काब्राल (भाजप) 28 कोटी, प्रवीण झांट्ये ( मगो) 21 कोटी, अशी मालमत्ता आहे. दिगंबर कामत ( काँग्रेस) 15 कोटी असून, इतरांची मालमत्ता 15 कोटीपेक्षा कमी आहे.

मतदानाचा कालावधी दोन तासांनी वाढला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी 2 तासांनी वाढला असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे. तत्पूर्वी पहाटे म्हणजे सकाळी 5.30 वा. मतदानाची रंगीत तालीम (मॉक पोल) निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच इतर मतदारांसाठी रॅम्प, पाणी, वीज, शौचालय अशी सर्व व्यवस्था करण्यात आली असून कडक उन्हात लोकांना उभे राहावे लागू नये म्हणून अनेक मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन ते तीन पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले असून भरारी पथके, सर्वसाधारण तसेच खर्च निरीक्षक एकंदरीत मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

301 उमेदवार रिंगणात

301 उमेदवार रिंगणात यंदा या निवडणुकीसाठी दहा राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात असून भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिव्होल्युशनरी गोवन्स, संभाजी ब्रिगेड हे पक्ष आपल्या उमेदवारांचे राजकीय भविष्य अजमावत आहेत. काँग्रेसने गोवा फॉरवर्ड बरोबर युती केली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचीही आघाडी आहे. 40 जागांसाठी 9 राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार मिळून 301 उमेदवार रिंगणात आहेत.

भाजप – 40 काँग्रेस – 37 गोवा फॉरवर्ड -3 आप – 39 तृणमूल काँग्रेस – 26 मगोप – 13 राष्ट्रवादी काँग्रेस – 12 शिवसेना -10 , संभाजी ब्रिगेड – 3

फॅमिली राज

2022 च्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 15 उमेदवार हे विधानसभेत कुटुंबशाही प्रस्थापित करू शकतात. हे सर्व उमेदवार निवडून आल्यास विधानसभेत 37.50 टक्के फॅमिलीराज आकाराला येऊ शकते. 2017 च्या तुलनेत ही टक्केवारी 17.50 टक्क्यांनी वाढू शकते. घराणेशाहीला थारा देणार नाही, अशा वल्गना सर्वच राजकीय पक्ष करतात आणि व्यवहार मात्र नेमका उलटा करत असतात. देशात सर्वत्र हे होत असते. गोवा त्याला अपवाद कसा असेल? जाहीर झालेल्या उमेदवारी पाहिल्या की, उक्ती आणि कृती यातील जमीन आसमान नव्हे तर पाताळ आणि आसमान यातले अंतर स्पष्ट होते.
2295 जण नवमतदार
मतदारांपैकी उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये पाच लाख 39 हजार 420 दक्षिण गोवा जिल्ह्यामध्ये सहा लाख 17 हजार 44 मतदार आहेत. मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे आणि गाळणे हा बदल 1.24 टक्के झालेला आहे. मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्याही एकूण मतदारांपैकी 1.67 टक्के आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याची संधी 2295 जणांना मिळणार आहे ते 18 ते 20 वयोगटातील आहेत.

18 टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी उभे राहिलेल्या 301 उमेदवारात 18 टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. 2017 मध्ये ही टक्केवारी आठ होती. 2012 च्या निवडणुकीत फक्त चार टक्के उमेदवार गुन्हेगारी स्वरूपाचे होते. त्यामुळे गोव्यात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावेळी ती तब्बल 18 टक्के झालेली आहे. ही गोव्यासाठी धोक्याची घंटा आहे.

कोरोनाबाधितांना टपालाने मतदान करता येणार

कोरोनाची लागण झालेल्यांना यावेळी टपालाने मतदान करता येईल. एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर पोचली आणि त्या व्यक्तीचे शारीरिक तापमान असाधारण असल्यास त्या व्यक्तीस पीपीई कीट घालूनच मतदान करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

Back to top button