गोव्यात आहेत ४० जागा आणि भाजप मिळवणार ४२ जागा, फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोमणा | पुढारी

गोव्यात आहेत ४० जागा आणि भाजप मिळवणार ४२ जागा, फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोमणा

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात भाजप २२ जागा जिंकेल असा दावा पक्षाचे निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्या दाव्याचा समाचार शिवेसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत घेतला आहे. यात त्यांनी भाजप सर्वच पक्ष जिंकण्याचा दावा करीत असून ११ पैकी ११ जागा जिंकू असे म्हणत आहोत. यावरूनच गोव्यातील भाजपला ४० पैकी ४२ जागाही मिळतील, असा खोचक टोमणा संजय राऊतांनी फडणवीसांना मारला आहे.

संजय राऊत सध्या गोव्यात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत. आज शुक्रवारी (दि.११) रोजी दुपारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे गोव्यात दाखल होणार आहेत. ठाकरे यांची पेडणे येथे काही राजकीय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर सायंकाळी सभा होणार आहे. तर उद्या शनिवारी ते साखळीत व म्हापसामध्ये रोडशो करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा गोव्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी पेलणारे देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात बर्‍याच दिवसांपासून कलगीतुरा रंगत आहेत. गोव्यातील प्रचारावेळी दोघेही महाराष्ट्रातील राजकारणावरून आपली मते व्यक्त करीत असल्याने सध्या गोव्यात त्यांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

मोदींच्या सभेनंतर गोव्यामध्ये भाजपावर मतदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे फडणवीस म्हटले होते. यावर संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये २० सभा झाल्या, केरळमध्येही सभा झाल्या. पंतप्रधान येतात तेव्हा त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असतो. त्यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा असतात. साधा मुख्यमंत्री गेला तरी लोकांच्या अपेक्षा असतात, हे तर पंतप्रधान आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या गोव्याशी भावनिक नाते असल्याचे सांगितले. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून गोव्यातील भाजपाच्या बैठकीमध्येच आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली, त्याविषयी राऊत म्हणाले, अख्ख्या देशाला गोवा भरभरुन देतो. गोव्याने बाळासाहेबांना, लोहियांना भरभरुन दिले आहे. गोव्यावर एका राजकीय पक्षाचा हक्क कधीच राहिला नाही.

गोवा गोल्डनच आहे, तुम्ही नंतर आलात..!

गोल्डन गोवा हा नारा देताना काँग्रेसने गोव्याला १४ वर्ष वनवासात नेल्याच्या पंतप्रधानांनी म्हापशात केलेल्या टीकेवर बोलताना राऊत म्हणाले की, गोवा गोल्डनच आहे. या गोल्डन गोव्यात तुम्ही नंतर आला आहात. गोवा स्वतंत्र झाला, इंदिरा गांधींनी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. नेहरुंनी येथे मोठं काम केलंय. आज बोलणारे लोक कुठे होते गोव्याच्या लढ्यात? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्राचा सहभाग होता, राममोहन लोहिया होते. गोव्याच्या मुक्तीसाठी लढणार्‍या इतर लोकांनी मिळून हा गोवा स्वतंत्र्य केल्याचे त्यांनी नमूद केले.

राऊत यांचा भाजपला इशारा

मुंबईत महालक्ष्मी येथील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकत्रीत पाहणी केली. यावेळी दोन्ही नेते एकाच गाडीत बसून गेले, त्यावर राऊत म्हणाले की, दोन्ही नेते एकत्र विकास कामांची पाहणी करत आहेत. एकत्रीत सोबत जात आहेत ही उत्तम गोष्ट आहे.

पण त्यामुळे भाजपच्या पोटात कळ येत आहे. दबावाचे राजकारण करून, धमक्या देऊनही महाविकास आघाडीला तडा जात नसल्याने भाजपला पोटदुखी झाली आहे. काही झाले तरी सरकारचे स्टेअरिंग ठाकर्‍यांच्याच हाती आहे आणि राहील, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राला कितीही वाकवण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र अजिबात झुकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.

Back to top button