Goa Election : गोव्यातील १८ टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी | पुढारी

Goa Election : गोव्यातील १८ टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ४० जागांसाठी उभे राहिलेल्या ३०१ उमेदवारांत १८ टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. तर राज्यांतील १२ मतदारसंघ अतिसंवेदनशील आहेत. ही माहिती गोवा इलेक्शन वॉच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) चे गोव्यातील संयोजक भास्कर असोल्डेकर यांनी दिली. (Goa Election)

२०१७ मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची टक्केवारी आठ होती. २०१२ च्या निवडणुकीत फक्त  चार टक्के उमेदवार गुन्हेगारी स्वरूपाचे होते. त्यामुळे गोव्यात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावेळी ती तब्बल १८ टक्के झालेली आहे. ही गोव्यासाठी धोक्याची घंटा आहे.

Goa Election : देशातील सर्वात जास्त अतिसंवेदनशील असलेले राज्य

गोव्यामध्ये बारा मतदारसंघ असे आहेत जे अतिसंवेदनशील आहेत. देशांतील ही सर्वात जास्त टक्केवारी आहे. एखाद्या मतदारसंघांमध्ये तीन व्यक्तीवर गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्यास तो मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार गोव्यात १२ मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे व्यक्ती असल्याचे असोल्डेकर यांनी सांगितले. ते मतदारसंघ  मांद्रे, मुरगाव, सावर्डे, पर्वरी, वाळपई, कळंगूट, पेडणे, शिवोली, नावेली, म्हापसा, कुंभारजुवे, साखळी असे आहेत.

३०१ उमेदवार रिंगणात

राज्यात जे  ३०१ उमेदवार आहेत , त्यातील १० कोटी पेक्षा जास्त संपत्ती असलेले श्रीमंत उमेदवार ६० आहेत. ही टक्केवारी २० टक्के आहे. २०१७ मध्ये २४९ उमेदवार होते. यावेळी ही संख्या ५२ उमेदवारांनी जास्त आहे. २०१७ व २०२२ या दोन्ही निवडणुकीत करोडपती उमेदवारांची संख्या  मात्र समान ६२ टक्के आहे.

३०१ उमेदवारांपैकी ६८ उमेदवार अपक्ष आहेत. एकूण बारा राजकीय पक्षांचे उमेदवार या वेळी मैदानात आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष व शिवसेना या सहा राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार या वेळी मैदानात  आहेत.  २०१७ मध्ये २४९ उमेदवार होते. तर यावेळी ही संख्या ३०१ वर पोहोचलेली आहे. त्यातील १८७ उमेदवार हे करोडपती असून ही संख्या ६२ टक्के होते. यावेळी पाच कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असलेले ९३ उमेदवार आहेत. यातील ६० जणांची मालमत्ता १० कोटीपेक्षा जास्त आहे, अशी माहिती असोल्डेकर यांनी दिली.

दहा कोटींची मालमत्ता असलेल्या ६० पैकी २० जणांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. २०१७ मध्ये ही संख्या सहा होती. यावेळी ही संख्या बरीच वाढली आहे. यावरूनन ‘मनी पॉवर व मसल पॉवर’ चा वापर राजकारणात वाढल्याचे स्पष्ट होते.

यावेळी आठ टक्के महिला उमेदवार मैदानात उतरल्या आहेत. २०१७ मध्ये ही संख्या सहा टक्के होती. उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येते. प्रतिज्ञापत्रकात नमूद मालमत्तेपेक्षा त्यांची मालमत्ता जास्त असू शकते. त्याची तपासणी निवडणूक अधिकार्‍याने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्याच्या मार्केट दरानुसार मालमत्तेची आकडेवारी देणे गरजेचे असते.

गोव्यातील लोकांना उमेदवार कसे आहेत. त्यांची पार्श्वभूमी काय आहे. त्यांचे शिक्षण किती आहे .स्वच्छ चारित्र्याचे किती उमेदवार आहेत, त्याची सविस्तर माहिती  मतदारांना मिळावी यासाठी गोवा इलेक्शन वॉच एडीआरतर्फे दर निवडणुकीच्या वेळी ही माहिती  प्रसारित केली जाते.

लोबो दाम्पत्य सर्वात श्रीमंत

२०२२ च्या निवडणुकीत उतरलेले श्रीमंत उमेदवार याप्रमाणे, मायकल लोबो  (काँग्रेस) ९३ कोटी.  डिलायला लोबो (काँग्रेस) ९३ कोटी. बाबूश मोन्सेरात (भाजप) ४८ कोटी, तर जेनिफर मोन्सेरात (भाजप) ४८ कोटी आहे. विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) ३७ कोटी. दीपक ढवळीकर (मगो) ३२ कोटी. जनिता मडकईकर (भाजप) ३२ कोटी, आंतोनिओ वाझ (काँग्रेस) ३० कोटी, निलेश काब्राल  (भाजप) २८ कोटी, प्रवीण  झांट्ये (मगो) २१ कोटी, अशी मालमत्ता आहे. दिगंबर कामत (काँग्रेस) १५ कोटी असून, इतरांची मालमत्ता १५ कोटीपेक्षा कमी आहे.

Back to top button