पणजी : अँटेलिया प्रकरणाचा मास्टर माईंड परमबीरच : सतेज पाटील | पुढारी

पणजी : अँटेलिया प्रकरणाचा मास्टर माईंड परमबीरच : सतेज पाटील

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटेलिया स्फोटके प्रकरणाचा मास्टर माईंड दुसरे तिसरे कोणी नसून, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंगच आहेत. मात्र, काही बातम्या पद्धतशीरपणे पेरल्या जातात, हे सर्व पूर्वनियोजितपणे केले जात आहे. ‘ईडी’नेच त्यावर खरेतर खुलासा करणे आवश्यक आहे. या बातम्या खर्‍या आहेत की खोट्या हे ईडीनेच सांगितले पाहिते, असे मत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले.

सतेज पाटील हे गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले आहेत. मुंबईत सिंग यांनी केलेल्या दाव्यावर पाटील यांनी मत व्यक्त केले. सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा माझ्यावर दबाव होता. त्यामुळेच मी वाझेला सेवेत घेतले, असा दावा परमबीर सिंग यांनी ईडीसमोर केला आहे.

सिंग यांच्या जबाबाचा धागा पकडून पाटील म्हणाले, अँटेलिया प्रकरणात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल. तेव्हाच सत्य बाहेर येईल. सत्य बाजू कोणती आहे ते त्या प्रतिज्ञापत्रातूनच स्पष्ट होईल. वाझेच्या प्रतिनियुक्तीविषयी बातम्या पेरल्या जात आहेत. ज्या पद्धतीने बातम्या बाहेर येत आहेत त्यात काही तथ्य आहे का, यावर ईडीनेच खुलासा करायला हवा. महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.

ज्यावेळी सत्य बाहेर येईल, तेव्हा परमबीरसिंग यांना सर्व आरोप खोटे असल्याचे समजेल. कोणत्याही पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या या ठरलेल्या प्रक्रियेनुसारच केल्या जातात. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतरच पोलीस अधिकार्‍याच्या बदल्या होत असतात.

Back to top button