पणजी, पुढारी वृत्तसेवा : पन्नास वर्ष काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला असणारा पर्ये मतदार संघ प्रतापसिंह राणे (Pratapsingh Rane) यांच्या माघारीमुळे आता काँग्रेसच्या हातून जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र या मतदारसंघातून त्यांच्या सून डॉक्टर दिव्या राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रतापसिंह राणे (Pratapsingh Rane) यांनी सोमवारी भूमिका मंदिरात नारळ ठेवला. ते सूने विरोधात उभे राहणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र राणे यांनी जाहीर रित्या आपण निवडणुकीस उभारणार नसल्याचे सांगितले. तसेच राणे यांच्या जागी त्यांच्या पत्नी विजयादेवी यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनीही आपल्याला कुटुंब कलह नको असून समाजकारणासाठी राजकारणी असण्याची आवश्यकता नाही. अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
तसेच, राणे यांच्या कन्या विश्वधरा राणे यांनीही मला माझ्या आई वडिलांचे स्वास्थ्य महत्त्वाचे असून राजकारणात कधीच स्वारस्य नव्हते व आताही नाही असे म्हटले आहे. त्यामुळे प्रतापसिंह राणे अथवा त्यांचे कुटुंबीय आता निवडणुकीत (Election) उभे राहणार नाहीत हे चित्र स्पष्ट आहे. मात्र यानंतर काँग्रेससाठी उमेदवार कोण असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेली पन्नास वर्ष या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे मात्र यावेळी इथे डॉक्टर दिव्या राणे यांचा तोडीस तोड उमेदवार न मिळाल्यास काँग्रेसला आपला बालेकिल्ला सोडावा लागणार आहे. त्यामुळे आता सध्या काँग्रेस या मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.