

मडगाव ; पुढारी वृत्तसेवा : उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन पक्षाने आपला विश्वासघात केला आहे, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या महिला उपाध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांच्यासह सांगेतील एकूण ३३ भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाच सामूहिक राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सावित्री कवळेकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत, असे सांगेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सांगेत सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांचा पत्ता कट केला आहे. सावित्री कवळेकर यासुद्धा भाजपच्या उमेदवारीच्या इच्छुक उमेदवार होत्या.दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या जाहीर प्रचाराची सुरुवातसुद्धा केली होती.
भाजपच्या उमेदवारीवर दावा करताना त्यांनी मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शनही केले होते.पक्षश्रेष्ठींनी फळदेसाईंच्या बाजूने झुकते माप दिल्यामुळे सावित्री कवळेकर भाजपच्या विरोधात बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. आपण आपला राजीनामा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना पाठवला आहे, अशी माहिती सावित्री कवळेकर यानी दिली आहे.
उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा विश्वास सावित्री कवळेकर यांना होता. त्यांच्याबरोबर असलेल्या भाजप मंडळातील तत्कालीन पदाधिकार्यांनी सांगेची उमेदवारी सुभाष फळदेसाई यांना जाऊ नये यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.
आरोप-प्रत्यारोप आणि एकाच पक्षाच्या बॅनरखाली दोन उमेदवार प्रचार करत असल्याने सांगेकरांनाही उमेदवारी कोणाला जाईल यावरून उत्सुकता लागून राहिली होती. अखेर पक्ष श्रेष्ठींनी फळदेसाई यांच्या बाजूने झुकते माप दिल्याने सावित्री कवळेकर यांच्यासमोर अपक्ष लढण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे.