

पणजी ; पुढारी वृत्तसेवा :
गोवा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी दिली. झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेस प्रत्येकी १० ते १२ जागा लढवतील असे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या दोन दिवसात आपली पहिली यादी जाहीर होईल असेही ते यावेळी म्हणाले. (Shiv sena- NCP Alliance)
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला चांगल्या जागा मिळतील, आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असेही पटेल यावेळी म्हणाले.
देशात आयाराम गयाराम ही प्रथा हरियाणापासून सुरू झाली होती. आता ती सर्वत्र पाहायला मिळते मात्र गोव्यात जे काही सुरू आहे ते अत्यंत घाणेरडे राजकारण आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्ष काँग्रेसी युतीबाबत चर्चा करत होते.
मात्र त्यांना स्वबळावर निवडून येऊ असे वाटते आहे. म्हणूनच आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला असे ते यावेळी म्हणाले. जनता आम्हाला अवलंबून बघेल, त्यामुळे आम्हाला जनतेने संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोण किती जागा लढणार यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. काही जागांसाठी चर्चा सुरू आहे. एखाद्या जागेसाठी गरज पडल्यास आम्ही माघार घेऊ किंवा एखाद्या जागी राष्ट्रवादी काँगेस माघार घेईल असेही राऊत यावेळी म्हणाले.