वारंवार बंद सर्व्हरपासून होणार सुटका ; दस्तनोंदणीचा वेग वाढणार

वारंवार बंद सर्व्हरपासून होणार सुटका ; दस्तनोंदणीचा वेग वाढणार
Published on
Updated on

पुणे :  जुनाट झालेल्या यंत्रणेमुळे राज्यातील दस्तनोंदणीचा सर्व्हर बंद पडत आहे. परिणामी राज्यातील सर्वच दस्तनोंदणी कार्यालयातील कामकाज पूर्णपणे थांबत आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दिवसभर कार्यालयात थांबूनही दस्तनोंदणी होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. वारंवार बंद पडत असलेल्या यंत्रणेवर मात करण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागात नवीन 2.0 प्रणाली बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात असून, नवीन वर्षापासून (2024) पासून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या नवीन यंत्रणेमुळे दस्तनोंदणीचे सर्व्हर बंद पडण्याची शक्यता अतिशय कमी असणार आहे.

राज्य शासनाच्या तिजोरीत दरवर्षी 20 ते 25 हजारांहून अधिक महसूल देणार्‍या नोदणी व मुद्रांक विभागाच्या दस्तनोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग गेल्या काही वर्षांपासून कमी होत गेला आहे. दस्तनोंदणी करण्याचे राज्यातील वाढलेले प्रमाण. त्यामानाने सर्व्हरची कपॅसिटी कमी होत जाणे यामुळे वारंवार सर्व्हर डाऊन होण्याची समस्या वाढू लागली आहे. राज्यात नोंदणी विभागाची सर्व महसूल विभागात मिळून 506 दस्तनोंदणी कार्यालये आहेत. त्या कार्यालयात दररोज किमान 10 ते 12 हजार विविध प्रकारच्या दस्तांची नोंदणी होत असते. महिन्याला किमान 2 ते सव्वादोन लाख आणि वर्षाला 26 लाखाहून अधिक दस्तनोंदणी होते. यामध्ये सर्वाधिक दस्त पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महसुली भागात होत आहेत. या महसुली विभागातही मुंबई आणि पुणे विभागात दस्तनोंदणी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

राज्यात गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून कोणत्याही मालमत्तेची खरेदी अगर विक्री करताना हातानेच दस्तनोंदणी होत असायाची. या पद्धतीमुळे अनेक गैरप्रकर होत असल्याची बाब पुढे आली. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल विभागान दस्तनोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करण्याची सोय उपलब्ध करून दिली. ही यंत्रणा 2006 सालापासून सुरू झाली. त्यावेळी इंटरनेट यंत्रणा ही बाब तेवढी फास्ट नव्हती. मात्र 2012 सालापासून 'आय सरिता' ही यंत्रणा बसविण्यात आल्यानंतर इंटरनेटच्या मदतीने सर्व राज्यातील दस्तनोंदणी प्रक्रिया पूर्णपणे सर्व्हरवर घेण्यात आली. मागील काही वर्षांपासून याही यंत्रणेवर भार येऊ लागला. त्यामुळे त्यात बदल करून सरिता ही प्रणाली एन.आय.सी.च्या माध्यमातून सुरू केली.

आता मात्र सध्या असलेल्या प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर भार येऊ लागला आहे. त्यातच राज्यात दस्तनोंदणीचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्तच वाढले आहे. त्यामुळे सध्याच्या सर्व्हर यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यामुळे ही यंत्रणा वारंवार बंद पडत आहे अथवा त्याचा वेग कमी होत आहे. त्यामुळेच दस्तनोंदणी कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, कर्मचार्‍यांसह नागरिकांना याचा मोठा फटका आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या की सर्व्हर यंत्रणेची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. ही बाब नोंदणी विभागाने राज्य शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या असून, एन.आय.सी.(नॅशनल इन्फॉरमेशन इन्स्टिट्यूट)च्या सहकार्याने अत्यंत नवीन आणि प्रगत असलेली 2.0 या प्रणालीवर काम सुरू केले आहे.

सर्व्हर बंद पडण्याची कारणे
जुनाट झालेली यंत्रणा
डॉक्युमेंटेशन होण्याचे वाढलेले प्रमाण
सर्व्हिस पुरविणारी क्लाऊड या यंत्रणेवर येत असलेला ताण
उपाययोजना
नवीन अत्यांधुनिक प्रणाली यंत्रणा बसविणे
इंटरनेट सुविधेचा वेग फास्ट करणे

नव्या प्रणालीने वेग वाढणार
एन.आय. सी.च्या सहकार्याने 2.0 ही प्रणाली तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील काही महिन्यांत ही सर्व्हर यंत्रणा दस्तनोंदणी विभागात बसविण्यात येणार आहे. या प्रणालीचा वेग सध्या असलेल्या 1.9 या प्रणालीपेक्षा जास्त असणार आहे.
                                    – अभिषेक देशमुख, उपमहानोंदणी निरिक्षक, पुणे

सर्व्हर बंद पडणे खेदजनक
सध्या दस्तनोंदणीच्या सर्व्हरला क्लाऊडद्वारे सेवा पुरविली जात आहे. मात्र, ही सेवा वारंवार खंडित होत असल्याने दस्तनोंदणी प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. यावर उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे. वारंवार सर्व्हर यंत्रणा बंद पडणे ही बाब खेदजनक आहे.
                                 – श्रीकांत जोशी, मार्गदर्शक अवधूत लॉ फाऊंडेशन

मुद्रांक विभागाचे दुर्लक्ष
सर्व्हर यंत्रणा वारंवर बंद पडत असल्यामुळे दस्तनोंदणी कार्यालयात येणार्‍या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे . या बाबीकडे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असे वाटते.
                              – रोहन सुरवसे-पाटील, दस्तनोंदणीचे अभ्यासक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news