

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सिद्धू मुसेवाला खून प्रकरणापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला (Salaman Khan) मारण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डी ब्रार या योजनेचे नेतृत्व करत होता. विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शार्प शूटर कपिल पंडित याला दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाईत भारत-नेपाळ सीमेवरून अलीकडेच अटक केली. कपिल पंडित, संतोष जाधव, सचिन विष्णोई थापन हे मुंबईतील वाजे परिसरात पनवेल येथे भाड्याची खोली घेऊन राहण्यासाठी आले होते.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे (Salaman Khan) पनवेल येथे फार्म हाऊस आहे. याच फार्म हाऊसच्या वाटेवर लॉरेन्सच्या नेमबाजांनी रेकी करून ही खोली भाड्याने घेतली होती आणि जवळपास दीड महिना ते येथे राहिले होते. लॉरेन्सच्या या सर्व शूटर्सकडे लहान शस्त्रे होती, त्या खोलीत सलमानवर हल्ला करण्यासाठी वापरली जाणारी पिस्तुल व काडतुसे होती. सलमान खानचे 'हिट अँड रन' प्रकरण घडल्यापासून सलमानची गाडी खूपच कमी वेगाने धावते हे शूटर्सनाही माहीत होते. यासोबतच सलमान खान जेव्हा केव्हा पनवेलमधील फार्म हाऊसवर येतो तेव्हा त्याचा अंगरक्षक शेरा त्याच्यासोबत असतो. इतकच नाही तर शूटर्सनी सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ताही ट्रॅक केला. त्या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत, त्यामुळे फार्म हाऊसपर्यंत सलमानच्या गाडीचा वेग ताशी 25 किमी असायचा.
लॉरेन्सच्या शूटर्सनीही सलमान खानचे (Salaman Khan) फॅन बनून फार्म हाऊसच्या सुरक्षा रक्षकांशी मैत्री केली होती. जेणेकरून त्यांना या 'बॉलीवूड अभिनेत्या'च्या हालचालीची सर्व माहिती मिळावी. त्या दरम्यान दोनदा सलमान त्याच्या फार्म हाऊसवर आला, पण लॉरेन्सच्या नेमबाजांना सलमानवर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही.