Lord Ganesha names meanings|बाप्पाच्या प्रत्येक नावामागे सुख-समृद्धीचा संदेश

Lord Ganesha names meanings|बाप्पाच्या प्रत्येक नावामागे सुख-समृद्धीचा संदेश
Ganesh
Ganesh Pudhari photo
Published on
Updated on

गणरायांना प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणरायांचे स्मरण करण्याची परंपरा आहे. मात्र, गणपती बाप्पांना केवळ एका नावाने ओळखले जात नाही. त्यांच्या विविध नावांमधून त्यांचे रूप, गुण, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि भक्तांवरील कृपेचे स्वरूप स्पष्ट होते. गणरायांची अशी अनेक नावे आहेत. त्यापैकी 'ही' १० नावे विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे अर्थही जाणून घेऊया.

१ गणपती

गणपती म्हणजे गणांचे प्रमुख किंवा स्वामी, भगवान शिवांनी गणेशांकडे गणांचे नेतृत्व सोपवले, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे त्यांना गणपती हे नाव मिळाले.

२ विनायक

विनायक म्हणजे श्रेष्ठ नेता, मार्गदर्शन करणारा, भक्तांच्या अडचणी दूर करून त्यांना योग्य मार्ग दाखवतात, अशी श्रद्धा आहे. हे नाव त्यांच्या मार्गदर्शक स्वरूपाची ओळख आहे.

३ गजानन

गजानन हा शब्द गज आणि आनन या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. गज म्हणजे हत्ती व आनन म्हणजे मुख. हत्तीप्रमाणे मुख असलेल्या गणेशांना गजानन, असे म्हटले जाते.

४ एकदंत

गणेशाच्या एका दातामुळे त्यांना एकदंत म्हटले जाते. धार्मिक कथांमध्ये त्यांचा एक दात तुटल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हे नाव त्यांच्या त्याग, संयम व धैर्याशी जोडले जाते.

9 लंबोदर

गणेशांचे उदर मोठे असल्यामुळे त्यांना लंबोदर असे संबोधले जाते. धार्मिक परंपरेत हे मोठे उदर व्यापकता आणि संपूर्ण सृष्टीला सामावून घेण्याच्या क्षमतेचे प्रतीक मानले जाते.

६ विघ्नहर्ता

विघ्न म्हणजे अडथळा आणि हर्ता म्हणजे दूर करणारा, त्यामुळे विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा. कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे यासाठी गणेशांचे स्मरण केले जाते.

७ सिद्धिविनायक

सिद्धी म्हणजे यश किंवा एखादे कार्य पूर्णत्वास नेण्याची क्षमता. सिद्धिविनायक हे नाव भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्याशी व कार्यसिद्धीशी जोडले जाते.

८ वक्रतुंड

गणेशांची सोंड वक्र असल्यामुळे त्यांना वक्रतुंड, असे म्हटले जाते. सोंडेचे हे वैशिष्ट्य सामर्थ्य, बुद्धिमत्ता व परिस्थितीनुसार मार्ग काढण्याची क्षमता यांचेही प्रतीक मानले जाते.

९ मंगलमूर्ती

मंगलमूर्ती म्हणजे शुभतेचे मूर्त स्वरूप, गणेशांना सुख, समृद्धी आणि शुभकार्याचे अधिष्ठाता मानले जाते. त्यामुळे शुभप्रसंगी सर्वप्रथम गणरायांचे पूजन करण्याची परंपरा आहे.

१० मोदकप्रिय

मोदकप्रिय' म्हणजे मोदक आवडणारा. गणेशाला मोदक अत्यंत प्रिय आहेत. मोदकाचे बाह्य आवरण व आतील गोड सार यामधून ज्ञानप्राप्तीचे प्रतीकात्मक अर्थ लावले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news