

चंद्रपूर : गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आणि दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात डॉल्बी साऊंड, प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच या साऊंड सिस्टिमच्या वाहतुकीसाठी बदल (मॉडिफाय) करण्यात आलेल्या वाहनांच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लागू राहणार आहे. या कालावधीत गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, दुर्गामूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकांसह विविध धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत.
या उत्सवांदरम्यान डॉल्बी साऊंडमधील टॉप, मिड व बेस मल्टीस्पीकरचे थर लावून भिंतीसारखी रचना उभारण्यासाठी वाहनांमध्ये बदल करून त्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. अशा उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमच्या वापरामुळे मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आदेशात व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिममुळे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ आणि ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
साऊंड सिस्टिम व सुधारित वाहने सील बंद ठेवण्याचे निर्देश
प्रतिबंधात्मक कालावधीत डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस मल्टीस्पीकर), प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मॉडिफाय केलेली वाहने संबंधित मालक व धारकांनी स्वतःच्या ताब्यात सिलबंद स्थितीत ठेवावीत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत त्यांचा वापर अथवा उपयोग करू नये. हे निर्देश गणेशोत्सव व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या आयोजकांनाही लागू राहणार आहेत.
ध्वनी मर्यादा पाळणाऱ्या साऊंड सिस्टिमला सूट
दरम्यान, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मध्ये विहित करण्यात आलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर हा प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही. संबंधित साऊंड सिस्टिम मालक, वाहनधारक, गणेश व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजकांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.