चंद्रपूर : नागभीड-ब्रह्मपुरी महामार्गावर कोर्धा गावाजवळ भरधाव अज्ञात वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये नितीन भरे (वय ३२, रा. बोंडेगाव, ता. ब्रह्मपुरी) आणि श्रावणी बेदरे (वय १२, रा. विरली, ता. लाखांदूर, जि. भंडारा) यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागभीडहून ब्रह्मपुरीकडे मारुती सुझुकी एस-प्रेसो (क्र. एमएच ३१ सीडी ९१८९) या कारमधून काही जण प्रवास करत होते. कोर्धा परिसरातील भोतमांगे धाब्यावर जेवण केल्यानंतर चालकाला डुलकी येऊ नये म्हणून कोर्धा गावाजवळ वाहन थांबवण्यात आले होते. याच दरम्यान मागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील नितीन भरे आणि श्रावणी बेदरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सहा प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला होता. नागभीड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच संबंधित वाहनाचा शोध घेतला आणि चालकाला ताब्यात घेतले.
जखमींच्या जबाबावरून नागभीड पोलीस ठाण्यात अप. क्र. ३०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४, १८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे आणि पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविदलवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार आणि पोलीस हवालदार राहुल लाखे करत आहेत.