Ashti Ganeshotsav : आष्टीच्या गणेशोत्सवाला सव्वाशे वर्षांची परंपरा

‘पेठेचा राजा’ आणि ‘कसबेचा राजा’ आजही मानकरी; पेठेच्या राजाची यंदा १३३ वी स्थापना
Ashti Ganeshotsav
Ashti Ganeshotsavpudhari photo
Published on
Updated on

आष्टी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आष्टी शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेला यंदाही भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याची झालर लाभली आहे. शतकाहून अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आष्टीच्या गणेशोत्सवात ‘पेठेचा राजा’ आणि ‘कसबेचा राजा’ हे दोन मानाचे गणपती आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहेत. यंदा ‘पेठेच्या राजा’ची १३३ वी स्थापना होत असून, नवसपूर्तीसाठी भाविकांकडून गणेशमूर्ती घेण्याची येथील अनोखी परंपरा आजही कायम आहे.

आष्टी शहरातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीयांच्या सहभागाचे प्रतीक बनला आहे. ‘पेठेचा राजा’ आणि ‘कसबेचा राजा’ या दोन्ही मंडळांकडून आपल्या गल्लीबाहेर वर्गणी मागण्याची प्रथा नाही. त्यामुळे उत्सवासाठी लोकसहभाग आणि स्वयंस्फूर्तीला येथे विशेष महत्त्व आहे. विविध जाती-धर्मांचे नागरिक एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत असल्याने आष्टीच्या गणेशोत्सवाला वेगळेच सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Ashti Ganeshotsav
Ausa rainfall shortage : औसा तालुक्यात पावसाच्या खंडाने सोयाबीन, उडीद संकटात

नवसपूर्तीसाठी गणेशमूर्ती घेण्याची परंपरा

‘पेठेच्या राजा’चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे नवसपूर्तीसाठी भाविकांकडून गणेशमूर्ती घेण्याची परंपरा. अनेक वर्षांपासून श्रद्धेने ही प्रथा सुरू असून, भाविकांच्या मनातील नवस पूर्ण झाल्यानंतर ते गणेशमूर्ती घेऊन उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे ‘पेठेचा राजा’ हा केवळ गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू न राहता अनेक भाविकांच्या श्रद्धेचा विषय बनला आहे.

मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा आष्टीचे नगरसेवक किशोर झरेकर यांनी सांगितले की, आमदार सुरेश आण्णा धस यांचीही ‘पेठेच्या राजा’वर विशेष श्रद्धा आहे. आमदार धस यांच्या गणेशमूर्ती स्थापनेचा क्रमांक २०३३ असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी अद्वैतचंद्र येथे गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी प्राजक्ता धस, युवा नेते जयदत्त धस, सागर आप्पा धस, गौरीताई सागर धस, ऐश्वर्याताई जयदत्त धस यांच्यासह नातू विश्वराज, परी आदी उपस्थित होते. शतकाहून अधिक काळाची परंपरा, नवसाची श्रद्धा आणि सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे आष्टीचा गणेशोत्सव आजही आपली वेगळी ओळख आणि ऐतिहासिक वैभव जपून आहे.

Ashti Ganeshotsav
Jalna Ganeshotsav 2026 : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण; बाप्पांचे थाटात आगमन!

जुन्या आरास-देखाव्यांची परंपरा लोप पावत असल्याची खंत

काही वर्षांपूर्वी आष्टी शहरातील गणेश मंडळांकडून सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर आकर्षक आरास व देखावे उभारले जात. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा होती. मात्र बदलत्या काळात ही परंपरा हळूहळू लोप पावत असल्याची खंत गणेशभक्तांकडून व्यक्त होत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत नर्तिकांना सहभागी करून घेण्याचीही एकेकाळी आष्टीत प्रथा होती. मात्र तत्कालीन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यकाळात ही प्रथा बंद करण्यात आली.

‘डीजे’पेक्षा पारंपरिक वाद्यांचा गजर करा

गणेशोत्सवाचा उत्साह साजरा करताना कर्णकर्कश डीजेचा अतिरेक टाळून पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे आणि सांस्कृतिक परंपरांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे. गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि परंपरेचा उत्सव आहे. त्यामुळे आष्टीच्या शतकाहून अधिक जुन्या गणेशोत्सवाच्या वैभवाला साजेसे आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे उत्सव साजरे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news