ओझर येथे गणेश जयंती सोहळा उत्साहात

ओझर येथे गणेश जयंती सोहळा उत्साहात
Published on
Updated on

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त 'गणपती बाप्पा मोरया'च्या नामघोषात भजनाद्वारे तसेच साधू मोरया गोसावींची पदे म्हणत आणि पुष्पपाकळ्यांची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथे बुधवारी (दि. १३) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी मंगलमय वातावरणात श्रींचा गणेश जयंती जन्मोत्सव सोहळा पार पडला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी ही माहिती दिली.

गणेश जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री विघ्नहर मंदिरामध्ये अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त रंगनाथ रवळे, राजश्री कवडे, श्रीराम पंडित आणि ग्रामस्थ यांच्या वतीने पहाटे ५ वाजता अभिषेक करण्यात आला. ठिक ७.३० वाजता महाआरती करण्यात आली. या आरतीसाठी गणेशभक्त अमोल काळे, शरद तापकीर, सागर मांडे, मंगेश वाघ, विनय तळेकर हे यजमान म्हणून लाभले.

चौथ्या द्वारयात्रेसाठी टाल-मृदंगाच्या गजरात भजने म्हणत सकाळी १० वाजता श्रींची पालखी ओझर येथील आंबेराई येथे रवाना झाली. त्या ठिकाणी अंबिकामाता मंदिरात धार्मिक पूजा करून श्रींच्या पालखीचे १२ वाजता मंदिरात आगमन झाले. दरम्यान, गणेशजन्माचे कीर्तन ह.भ.प. धामाचार्य शंकर महाराज शेवाळे (मंचर) यांनी केले. ग्रामस्थ, देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी, विघ्नराजेंद्र जोशी, जयेश जोशी, अमय मुंगळे यांनी मोरया गोसावी पदांचे गायन केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, आनंदराव मांडे, रंगनाथ रवळे, किशोर कवडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, कैलास मांडे, मिलिंद कवडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, राजश्रीताई कवडे यांनी जन्मोत्सवाचे नियोजन केले.

गणेशभक्तांनी 'गणपती बाप्पा मोरया'च्या नामघोषात दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. हजारो भाविकांनी रांगेत श्रींचे दर्शन घेतले.ओतूर पोलिस कर्मचारी तसेच देवस्थानचे व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनी श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन केले.

मंदिराची आकर्षक सजावट

विशेष अशा द्राक्षांची आरास श्री विघ्नहर मंदिरामध्ये करण्यात आली. संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. विघ्नहर्ता गणरायाचा मंदिर गाभारा, आवार आणि मंदिराबाहेरील परिसरातील गणेशभक्तांच्या प्रचंड गर्दीने व श्रींच्या नामघोषामुळे परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news