

अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या हत्येच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. कुटुंबातील पाच जणांच्या हत्येसाठी अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील दाेन महिला आराेपींनी हा धातू तेलंगणा राज्यातून आणल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असले; तरी त्याचा मुख्य स्त्रोत शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलिसांनी पाचही जणांच्या मृत्यूचे गूढ उकलल्यानंतर रोशन कुंभारेंची पत्नी संघमित्रा कुंभारे व मामी रोजा रामटेके या दाेघींना अटक केली आहे. न्यायालयाने दोघींना १० दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. तपासादरम्यान दोघींनी धातूमिश्रीत विष देऊन अतिशय थंड डोक्याने पाचही जणांचा जीव घेतल्याची कबुली दिली आहे. ( Thallium poisoning case )
अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील कुंभारे कुटुंबातील शंकर यांचा २६ सप्टेंबरला तर त्यांच्या पत्नी विजया यांचा २७ सप्टेंबरला मृत्यू झाला हाेता. यानंतर ८ ऑक्टोबरला मुलगी कोमल दहागावकर, १४ ऑक्टोबरला आनंदा उराडे, तर मुलगा रोशन याचा १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला हाेता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणी सखाेल चौकशीचे आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात तपास करुन पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास सुरुवात झाली.
शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्याशी डिसेंबर २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला. दोघेही पोस्टात नोकरीला होते. प्रेमविवाह मान्य न झाल्याने एप्रिल २०२३ मध्ये संघमित्राच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यू झालेल्या पाच जणांचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. यातील पाचही जणांमध्ये जी लक्षणे दिसत होती; ती संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके यांच्यात दिसत नव्हती. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली हाेती. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, भयावह माहिती पुढे आली.
रोशनची पत्नी संघमित्रा कुंभारे हिला पोलिसांनी बोलते केले असता, आपण आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला. त्यानंतर इथे नांदायला आल्यानंतर सासरची मंडळी माहेरच्यांच्या नावाने टोमणे मारुन त्रास द्यायची. ही बाब कळताच माझ्या वडिलांनी एप्रिल महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली. रक्षाबंधनासाठी आपण माहेरी जाऊ देण्याची विनंती केली असता, पती रोशन आणि सासू, सासऱ्यांनी त्यास विरोध केला. तर रोशनची मामी रोजा रामटेके हिने तिच्या सासऱ्याच्या नावावर असलेल्या ४ एकर शेतीतून विजया कुंभारे आणि तिच्या बहिणी हिस्सा मागत असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघींनीही पाचही जणांना विष पाजून ठार मारण्याची योजना आखली. दरम्यान, या प्रकरणातील दाेन महिला आराेपींनी कुटुंबातील १६ जणांचा विष देवून मारण्याचा कट रचला होता, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
सर्वांना संपविण्याची योजना आखल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी दोघींनी धोतऱ्याचे विष ऑनलाईन मागविले. परंतु ते विष पाण्यात टाकल्यानंतर हिरवे झाले. त्यामुळे शंका यायला नको म्हणून त्यांनी धोतऱ्याचा फॉर्म्युला रद्द केला. कृषिशास्त्रात पदवीधर असलेल्या संघमित्राला थॅलियम धातूबाबत माहिती होती. इंटरनेटवर तिने सर्चसुद्धा केले. थॅलियम आणण्याची रोजा रामटेके हिने तेलंगणात जाऊन थॅलियम आणले. हे विष पाण्यात टाकून पाहिले असता, ते पाण्यात विरघळणारे, रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी संधी मिळेल तेव्हा ते विष मृतकांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळले. दोन जणांना मांसाहारी जेवणातून, एकाला डाळीतून तर दोन जणांना पाण्यातून विष देण्यात आले. या विषाचा पाचही जणांच्या प्रकृतीवर हळूहळू विपरित परिणाम झाला आणि शेवटी सर्वांनी एकापाठोपाठ एक प्राण सोडला. वाहनचालक राकेश मडावी, मोठा मुलगा सागर आणि शंकर कुंभारे यांच्या साळीचा मुलगा हे तिघेही आजारी आहेत. सध्या तिघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.
ऑगस्ट महिन्यात रोशनने संघमित्राला मारहाण केली होती. त्यामुळे तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. परंतु रोशनशी भावनिक नाते असल्याने त्याला विष पाजण्याची संघमित्राची इच्छा नव्हती. मात्र, रोशनची मामी रोजा रामटेके हिने जमीन बळकावण्यासाठी संघमित्राला जबरदस्ती करुन रोशनलाही विष देण्यास भाग पाडले, अशी माहिती पोलिस तपासात समाेर आली आहे.
रोशन कुंभारे याच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर त्याला नागपुरातील दवाखान्यात भरती करण्यात आले. तेथेही सुरुवातीला काहीच निदान न झाल्यानंतर जाणकारांनी थॅलियमची चाचणी करण्यास सांगितले. ही चाचणी केली असता रक्तात थॅलियमचे अंश आढळून आले.
थॅलियमच्या वापरावर अनेक देशांमध्ये बंदी पारासदृश थॅलियम धातू हा रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याने हळूहळू शरीरात पसरुन मृत्यूस कारणीभूत ठरतो. मोठ्या नेत्यांच्या हत्येत थॅलियमचा वापर करण्याच्या घटना घडल्याचे सांगितले जाते. अमेरिकेसह काही देशांमध्ये या धातूवर बंदी आहे.
हेही वाचा :