विधानभवनातून : ठाकरेंची रणनीती अन् अजितदादा थंड

विधानभवनातून : ठाकरेंची रणनीती अन् अजितदादा थंड
Published on
Updated on

विधानभवनातून; दिलीप सपाटे : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोमवारी संध्याकाळी नागपूरला आगमन झाले आणि हिवाळी अधिवेशनाची थंड हवा चांगलीच तापली. त्यांच्या उपस्थितीत ठरलेल्या रणनीतीने ठाकरे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपावरून विधानपरिषदेच्या सभागृहात पहिल्यांदाच जोरदार हल्ला चढविला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यात पहिल्यांदा शिवसेना सरसावल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, त्याच- वेळी विधानसभेत मात्र या मुद्यावर विरोधक काहीसे थंडच दिसले..

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मुद्दा हाती लागला असताना आणि मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची संधी चालून आली असताना विधानसभेत विरोधकांनी ही संधी साधलीच नाही. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले असताना विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांची चुप्पी चर्चेचा विषय ठरली.

विधानपरिषदेत सुरुवातीलाच शिंदे यांच्या मार्फत झालेल्या भूखंड वाटपाचा मुद्दा विरोधकांनी लावून धरत सभागृहाचे कामकाज बंद पाडले असताना विधानसभेत मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कामाला दिलेल्या स्थागितीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले होते. या मुद्यावर त्यांनी चारवेळा सभगृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र,मुख्यमंत्री शिंदे यांच्या जमीन वाटपाचा मुद्दा अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला नाही.

विधापरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी बंद पडल्यानंतर काही वेळाने माजी मंत्री छगन भुजबळ यांनी वरच्या साभगृहात नेमके काय झाले, अशी विचारणा केली त्यावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यावर अजित पवार यांनी त्यांना बोलण्याची संधी द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, अशी विनंती अध्यक्षांना केली तरी त्यांनी भूखंड वाटपावरून कोणतेही भाष्य केले नाही. अखेर विरोधकांनी बोलू न दिल्याने सभात्याग केला. खर तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी नऊ वाजताच महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भूखंड वाटपावरून दोन्ही सभागृहात आक्रमक होण्याची सूचना केली होती. त्यासाठी रणनीतीही आखण्यात आली. त्यावर विधानपरिषदेत अंमलबजावणी झाली. मात्र, विधानसभेत अजित पवार आणि विरोधक काहीसे थंड असल्याचे चित्र होते. उद्धव ठाकरे यांना विधानसभेत हा मुद्दा का लावून धरला नाही अशी विचारणा पत्रकारांनी पत्रकार परिषदेत केली असता आमची सकाळी बैठक झाली. त्यामध्ये सदर प्रकरण जमेल तसे दोन्ही सभागृहात उपस्थित करण्याचे ठरले होते. विधान परिषदेत या मुद्यावर आघाडीच्या सर्व सदस्यांमध्ये एकजूट होती, असा दावा उद्धव ठाकरे यांनी करताना विधानसभेतही तो मांडला जाईल, असे ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्यात विधानसभेत विरोधकांमध्ये एकजूट नसल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news