

पुढारी ऑनलाईन: फ्रान्समधील शाळांमध्ये 'धर्मनिरपेक्ष' कायद्यांच्या उल्लंघनाचा हवाला देत फ्रान्सचे शिक्षणमंत्री गॅब्रिएल यांनी शाळांमध्ये लवकरच 'अबाया' (abaya) ड्रेसवर बंदी घातली जाईल, असे म्हटले आहे. यासंदर्भात नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी शाळा प्रमुखांना स्पष्ट नियम प्रदान केले जातील, असे फ्रान्सच्या शिक्षणमंत्र्यांनी (France News) स्पष्ट केले आहे, या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.
फ्रान्सच्या शिक्षणमंत्र्यांनी रविवारी (दि.२७) माध्यमांशी बोलताना सांगितले की, शिक्षक आणि पालकांमधील वादावरून शाळांमध्ये अबाया घालण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शाळेतील तणाव वाढल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे फ्रान्समधील सरकारी शाळांमध्ये अबाया ड्रेस घालण्यास बंदी घालण्यात येणार आहे, असेही फ्रान्सचे शिक्षणमंत्री गॅब्रिएल (France News) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान यापूर्वीच देशातील शाळांमध्ये हेडस्कार्फ घालण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच २०१० मध्येच फ्रान्सने सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर पूर्णपणे बुरखा घालण्यास बंदी घातली आहे. 'अबाया ड्रेस' हा एक सैल-फिटिंग आणि पूर्ण-लांबीचा मुस्लिम महिला परिधान करत असलेला पोशाख आहे.
शिक्षणमंत्री गॅब्रिएल यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शाळेत 'अबाया' घालण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. जेव्हा तुम्ही वर्गात जाता तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांकडे बघून त्यांचा धर्म सांगता कामा नये, त्यामुळे मी ठरवलंय की शाळांमध्ये अबाया घालायचा नाही, असेही फ्रान्सचे शिक्षणमंत्री गॅब्रिएल यांनी म्हटले आहे.