

अॅमस्टरडॅम : वृत्तसंस्था; दीर्घकाळ आजाराशी सामना केल्यानंतर नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हेन एग्त आणि त्यांच्या पत्नी यूजीन यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी इच्छामरण स्वीकारून हातात हात घेत जगाचा निरोप घेतला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचेही मृतदेह शेजारी-शेजारीच दफन करण्यात आले आहेत. (Former Dutch PM)
यूजीन यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते की, एग्त मला आजही 'माय गर्ल' असेच संबोधतात. एग्त हे १९७७ ते १९८२ या कालावधीत नेदरलँडचे पंतप्रधान होते. या देशात २००० मध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. त्यामुळे तेथील नागरिक इच्छामरणाची मागणी करू शकतात. जे खूप आजारी झाले आहेत आणि त्यांच्यावर आता उपचार होणे अशक्य आहे किंवा ज्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे महाकठीण आहे असे लोक इच्छामरण मागू शकतात. (Former Dutch PM)
एग्त आणि यूजीन हे ६८ वर्षे एकमेकांबरोबर होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच इच्छामरणाचा निर्णय घेतला. एग्त यांना २०१९ मध्ये एका चर्चासत्रात भाषण करताना ब्रेन हॅमरेज झाले होते. अनेकदा ते पक्षविरोधी भूमिका घेत. परिणामी, त्यांच्यावर टीका होत असे. २०१७ मध्ये त्यांनी ख्रिश्चन डेमोक्रॅटिक हा स्वतःचा पक्ष सोडला. विशेष म्हणजे ते कडवट इस्रायलविरोधक आणि पॅलेस्टाईनचे कट्टर समर्थक होते. या जोडप्याला तीन मुले आहेत.
इच्छारणाच्या या प्रकरणातील एक तरतूद महत्त्वपूर्ण आहे. एखाद्याच्या इच्छा मृत्यूवर कोणी प्रश्न उपस्थित केला आणि डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचे अथवा हलगर्जीपणा केल्याचे समोर आले, तर डॉक्टरला १२ वर्षांची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, २०२२ मध्ये नेदरलँडमध्ये ८ हजार ५०० लोकांनी इच्छा मरण स्वीकारले होते.