

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील तेली खड्डा येथे अज्ञात तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून एकाला मारहाण करत सोने, मोबाईल व पैसे जबरदस्तीने चोरी केल्याची घटना घडली. तक्रारदार जडीबुटी औषध विक्रेता असून हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर काही जणांनी मदत करण्याचा प्रयत्न केला असता कोयता हवेत फिरवून संशयितांनी दहशत माजवली. दरम्यान, सातार्यात जबरी चोरीची सलग दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंदलसिंग रतनसिंग चितोडिया (वय 49, रा. राधिका रोड, सातारा) यांनी अनोळखी तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे. ही घटना दि. 11 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार हे तेली खड्डा परिसरात असताना आडोशाला तिघेजण आले. संशयितांनी तंबाखू आहे का? अशी विचारणा करत त्यांना बाजूला घेतले. यावेळी एका संशयिताने कोयता काढून दहशत माजवली. दुसर्या संशयिताने दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण केली. तिसर्या संशयिताने तक्रारदार यांना अंगावरील सोने, पैसे व मोबाईल देण्यास सांगितले. घडलेल्या घटनेने तक्रारदार घाबरले. त्यांनी मदतीसाठी काही लोकांना हाक मारण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी तोंड रुमालाने दाबले व मारहाण केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार यांच्या कानातील बाल्या जबरदस्तीने ओढल्याने त्यांच्या कानातून रक्त येवू लागले. याचदरम्यान संशयितांनी 30 हजार रुपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाच्या बाल्या, 2 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख 500 रुपये असा एकूण 32500 रुपये किंमतीचा मुद्देमाल संशयित तिघांनी जबरदस्तीने घेतला.
ही घटना पाहिल्यानंतर काही नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी हवेत कोयता फिरवत धुडगूस घातला. नागरिक जमू लागल्याचे पाहताच संशयितांनी तेथून धूम ठोकली. तक्रारदार जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन जखमी तक्रारदार यांची तक्रार घेतली. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेवून संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली.