

अन्न पचनाची क्रिया ही तोंडातच सुरू होते. जेवण केल्यानंतर पोट फुगल्यासारखे किंवा गच्च वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही अन्न व्यवस्थित चावलेले नाही, ते वेगाने गिळले आहे, असा होतो. म्हणून अन्न दाताने व्यवस्थित चावणे अत्यंत आवश्यक असते.
एखादा पदार्थ खाण्यासाठी निवडल्यानंतर तो तोंडात टाकताच तोंडाचे काम सुरू होते. जीभ, दात यांचा वापर करून आणि सलायव्हरी ग्लँडमधील एन्झायमच्या मदतीने खालेल्या घासाचे रासायनिक विघटन होऊ लागते आणि शरीर शोषून घेऊ शकेल अशा प्रकारचे अन्नाचे रेणू तयार होतात. म्हणूनच आहार तज्ज्ञ नेहमीच आपल्याला सावकाश जेवण्याचा सल्ला देतात. खाल्लेला घास किमान 20 वेळा तरी व्यवस्थित चावला पाहिजे, असे ते सांगतात. याचे कारण म्हणजे अन्न पचनाची क्रिया ही तोंडातच सुरू होते. जेवण केल्यानंतर पोट फुगल्यासारखे किंवा गच्च वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही अन्न व्यवस्थित चावलेले नाही, ते वेगाने गिळले आहे, असा होतो. म्हणून अन्न दाताने व्यवस्थित चावणे अत्यंत आवश्यक असते. म्हणूनच आपण लहान मुलांना बारीक केलेले अन्न देतो. लहान मुलांना चावण्यासाठी दात नसतात त्यामुळे ते स्वतः अन्नाचे बारीक तुकडे करू शकत नाहीत.
अन्न चावून खाण्याचे भरपूर फायदे आहेत. त्यापैकी महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीराचा घेर वाढण्याची क्रिया यामुळे कमी होते. कारण घास चावल्यामुळे नैसर्गिकरीत्या शरीरात कॅलरी साचण्याचे प्रमाण कमी होते. तसेच दुसरा फायदा म्हणजे व्यवस्थित अन्न चावल्यामुळे अन्नाचे पचन अधिक चांगले होते. पचनासाठी उपयुक्त असणारे एन्झाइम्स पोटापेक्षा अधिक प्रमाणात तोंडामध्येच तयार होतात आणि तेथेच ते अन्नामध्ये मिसळतात. त्यामुळे तोंडात घास अधिक वेळ चावणे हे अन्नाचे विघटन होण्यास उपयोगाचे ठरू शकते.
घास अधिक वेळा चावल्यामुळे त्याच्या चवीचा आपण अधिक प्रमाणात आनंद घेऊ शकतो. हे तुम्ही निरीक्षणावरून अनुभवू शकता. जेवताना अन्नपदार्थ फार थंडही नसावेत आणि फार गरमही नसावेत. आपल्या शरीराच्या तापमानाइतके ते असावेत. अधिक गरम किंवा अधिक गार पदार्थ खाल्याने पचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
आपण तोंडामध्ये काय टाकतो तेव्हापासूनच पचनाची समस्या सुरू होते. अधिक प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ, ज्या अन्नपदार्थात स्वीटनर्स, कृत्रिम रंग, कृत्रिम फ्लेवर, कृत्रिम प्रिजरवेटिव्हज आहेत त्यांचा आहारात वारंवार समावेश केल्यास पचनाचे त्रास सुरू होतात.
प्रोसेस्ड फूड अथवा डबाबंद अन्नपदार्थामुळे संपूर्ण शरीराचेच आरोग्य धोक्यात येते. या अन्नामुळे अधिक प्रमाणात कॅलरीज वाढतात. शिवाय, या पदार्थात अत्यल्प प्रमाणात पोषक घटके असतात. म्हणूनच असे पदार्थ सतत खाणार्या व्यक्तींना वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना दिसतात. असे अन्नपदार्थ शरीरात विषारी घटक निर्माण करतात.
तसेच यामुळे ट्रान्सफॅटस्, हायफ्रुक्टोज तयार होते ते आरोग्यासाठी चांगले नसते. तसेच काही वेळेला हे अन्न शरीराकडून स्वीकारले जात नाही आणि शरीर त्याच्याशी बाह्य घटक म्हणून वागते. काही वेळेला शरीराकडून त्याच्याविरोधात शक्तिशाली अँटिबॉडीज तयार केल्या जातात. या अन्नपेशींना मारताना शरीराने तयार केलेल्या अँटिबॉडीज आपल्या पेशींनासुद्धा नुकसान पोहोचवतात. अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये याचे प्रमाण आणि लक्षणे वेगवेगळी असू शकतात. परंतु, असे होत असल्यास संबंधित व्यक्तीला वेगवेगळे त्रास होऊ शकतात. म्हणून घरचे स्वच्छ, ताजे आणि सात्विक अन्न खावे.
डॉ. महेश बरामदे