Foot Health : पादत्राणांची निवड आणि पायांचे आरोग्य

Foot Health : पादत्राणांची निवड आणि पायांचे आरोग्य
Published on
Updated on

शरीरातील काही गुंतागुंतीच्या संरचनांपैकी एक अवयव म्हणजे आपले पाय होय. आपल्या शरीराचा संपूर्ण भार उचलण्यासोबतच शरीराचे संतुलन राखण्यास ते अतिशय महत्त्वाचे सहायक असतात. त्यामुळे फुटवेअर्सची निवड करतानादेखील अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. कारण योग्य प्रकारचे फुटवेअर घातल्यामुळे अंगठ्याचे हाड वाढणे, कंबरदुखी, गुडघेदुखी, पोटर्‍यांमधील वेदना, चाल बिघडणे यांसारख्या अनेक शारीरिक त्रासांपासून आराम मिळू शकतो. (Foot Health)

फुटवेअर्स खरेदी करताना पायांची संरचना म्हणजे पायांची लांबी, पंजाचा पसरटपणा आणि पंजाच्या तळव्यांची गोलाई या सर्व गोष्टी विचारात घ्याव्यात.

Foot Health : फुटवेअर्स खरेदी करताना

फुटवेअर्स खरेदी करताना आणखीही काही गोष्टींचा विचार करायला हवा. ज्यावेळी आपण आराम करत असतो तेव्हा पायांचे पंजे थोडेसे आकुंचन पावलेले असतात आणि शरीराचे वजन पायांवर पडताच पंजांची लांबी आणि रुंदी दोन्ही वाढते. म्हणून कुठलेही फुटवेअर खरेदी करताना ते पायात घालून थोडेसे लांबपर्यंत चालून बघावे. फुटवेअर्स खूप घट्ट बसणारेही नसावेत आणि फार सैलही नसावेत. पायाचा सर्वात मोठा अंगठा आणि बुटाचे पुढचे टोक यामध्ये अर्ध्या इंचाचे अंतर असले पाहिजे. बुटांचा पुढचा भाग गोल किंवा चौकोनी असावा. यामुळे बोटांची हालचाल होणे आणि ते आकाराने मोठे होणे या क्रिया सहज होतील. फुटवेअर्स खरेदी करताना ते पायाच्या आकाराच्या नंबरनुसार खरेदी करण्याऐवजी पायाला ते किती व्यवस्थित फिट बसतात हे बघावे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याचे कारण म्हणजे चुकीचे फुटवेअर्स वापल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात.

चुकीचे फुटवेअर घातल्यामुळे मोर्टन न्युरोमा नावाचा वेदनादायी त्रास होऊ शकतो. यामध्ये रुग्णाच्या पायाच्या तिसर्‍या आणि चौथ्या बोटामध्ये सूज, जळजळ, असाह्य वेदना आणि बधिरता निर्माण होते. यामुळे पायांना कायम स्वरूपी त्रास होऊ शकतो. मोर्टन न्युरोमा हा त्रास साधारण उंच टाचांचे फुटवेअर घालणार्‍यांना होतो. ही समस्या गंभीर बनली तर शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते. अशा वेळी रुग्णाला रुंद पंजा असणारे फुट वेअर सोबत सिलिकनपासून बनवलेले टो सेप्रेेटर लावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे अंगठ्याचे हाड सरळ होते.

बनियन्स : म्हणजे अंगठ्याच्या जोडाचे हाड वाढणे. ज्या व्यक्ती घट्ट पंजा असणारे फुट वेअर घालतात त्या व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. यामध्ये अंगठा पायाच्या इतर बोटांच्या दिशेने वाढू लागतो. यामुळे सूज आणि वेदना होऊ लागतात.

हॅमर टो : या त्रासाचे प्रमुख कारण देखील चुकीची पादत्राणे घालणे हेच आहे. टोकदार पंजे असणारे बूट घातल्यामुळे पंजे सतत घट्ट राहतात. ते सरळ होऊ शकत नाहीत. तसेच हळूहळू खालच्या दिशेने वळू लागतात. यामुळे पंजाच्या वरच्या भागात जखम होते. अशा व्यक्तींनी रुंद आणि मोठ्या आकाराची फुट वेअर्स वापरावीत, असा सल्ला दिला जातो.

फूट कॉर्न : बहुतेक वेळा तळव्यांच्या त्वचेच्या घर्षणामुळे फूट कॉर्न बनते. तळव्यांच्या बाहेरच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी चुकीचे फुटवेअर घातल्यामुळे डाग पडतो, तेथे कडक त्वचा एकत्र होते आणि घट्टा पडल्यासारखी जाड त्वचा बनते. यामध्ये वेदनाही होऊ शकतात. मधुमेह, संधिवात आणि अधिक वजन असणार्‍या व्यक्तींना फूट कॉर्नचा सर्वात जास्त धोका असतो.

हॅलक्स रिजीडस : या आजारात अंगठ्यांच्या हाडांचे सांधे जाम होतात आणि पायात वेदना वाढतात. पायांना सूज येते. या आजारात पादत्राणाचे तळवे थोडे जास्त मजबूत करतात. काही वेळेला सोलच्या आत स्टीलची एक प्लेटही लावली जाते. मधुमेही रुग्णांना अशा स्थितीत प्रामुख्याने पायांकडे लक्ष ठेवले पाहिजे. चुकीची पादत्राणे घालल्यास पायात जखम होऊ शकते. अलीकडेच मधुमेही रुग्णांसाठी विशिष्ट प्रकारचे फुटवेअर बाजारात मिळतात. त्याचा वापर करता येऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news