Diwali Recipe : कुरकुरीत आणि खमंग चकली कशी कराल?  | पुढारी

Diwali Recipe : कुरकुरीत आणि खमंग चकली कशी कराल? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी (Diwali Recipe) बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी अशा अनेर रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘चकली’ची रेसिपी पाहुया…

दक्षिण भारतात ‘मुरुक्कू’, गुजरातमध्ये ‘चक्री’ आणि महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘चकली’, संबोधला जाणारा पदार्थ डोळ्यासमोर आला की, तोंडाला पाणी सुटते. कुरकुरीत चकली कुणाला आवडत नाही? जो-तो चकलीचा चांगलाच खवय्या असतो. साधारणपणे महाराष्ट्रात दिवाळीमध्ये केला जाणारा हा पदार्थ आता काॅमन झाला आहे. सकाळी नाष्त्याला चकली खाण्याचंही प्रमाण वाढलं आहे. चला तर अशी कुरकुरीत चकली कशी करायची, ते पाहू…

Diwali Recipe

चकलीच्या भाजणीचे साहित्य : जुना जाड तांदूळ -१ किलो, अर्धा किलो चणाडाळ, ५० ग्रॅम उडीद डाळ, २०० ग्रॅम मूग डाळ, १०० ग्रॅम साबुदाणे, १०० ग्रॅम पोहे, २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम धणे,

कृती : तांदूळ, डाळी व इतर साहित्य निवडून घ्या. तांदूळ धुवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावे. सुती कापडवर पसरून दिवसभर खडखडीत वाळवून घ्या.

प्रत्येक डाळी मध्यम गॅसवर न करपवता भाजून घ्या. त्याचा खमंग वास आला की, भाजवणं थांबवा. त्याच पद्धतीने पिवळा रंग प्राप्त होईपर्यंत तांदूळदेखील भाजून घ्या. तसेच पोहेदेखील भाजून घ्या. फक्त भाजताना पोहे जळणार नाही, याची काळजी घ्या.

तसेच मध्यम गॅसवर साबुदाणा भाजा. साबुदाणा हा भाजताना फुलतो, तेव्हा तो भाजण्याचा थांबवा. जिरे आणि धणेसुद्धा भाजून घ्या. भाजलेले सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे आणि इतर जिन्नस थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून घ्या.

मुख्य कृती : चकलीचे पीठ मळताना पहिल्यांदा ते चाळून घ्या. एकदम पीठ मळू नका. थोडेथोड पीठ मळून चकल्या बनवा. कारण, जास्त पीठ मळलं की, पीठ जास्त वेळ ओलं राहतं आणि चकल्या चांगल्या होत नाहीत.

साहित्य : २ कप भाजणीचं पीठ, १ चमचा घरगुती मसाला किंवा लाल मिरची पावडर, ३ चमचे तीळ, १ चमचे ओवा, ३ चमचे मोहरीचे तेल, १ काप पाणी, १ चमचा मीठ, तळण्यासाठी लागणारे तेल इ…

Diwali Recipe

चकली तयार करण्याची प्रत्यक्ष कृती

१) परातीत भाजणी, तीळ, ओवा, लाल तिखट आणि मीठ चांगले मिक्स करून घ्या.

२) गॅसवर कढईत ३ चमचे मोहरीचे तेल गरम करून परातीत घेतलेल्या पीठ घालावे.

३) पाणी घेऊन कणीक मळून घ्या. गरम पाणी वापरू नका.

४) चकलीच्या सो‍च्याला आतून तेल लावून घ्या. म्हणजे साच्यात पीठ चिकटणार नाही.

५) नंतर एक पिठाचा गोळा करून साच्यामध्ये घालावा आणि एका तेल लावलेल्या भांड्यात चकल्या पाडून घ्याव्यात.

६) गॅसवर एका कढईत तळण्यासाठीचं तेल चांगलं गरम करून घ्या. पण, चकल्या तेलास सोडल्यानंतर गॅस मध्यम करावा. इथं एक काळजी घ्यावी की, कढईमध्ये एकाच वेळी चकल्यांची गर्दी होऊ देऊ नका. त्यासाठी एकाच वेळी चार चकल्या तेलात सोडा.

७) थोड्या वेळाने चकल्यांचा रंग बदलू लागेल आणि तेलातील चकल्यांच्या भोवतीचे बुडबुडे बंद होऊ लागतील. याचाच अर्थ चकल्या चांगल्या तळल्या गेल्या आहेत. कढईतून चकल्या काढून घ्या आणि कागदावर पसरवून घ्या. अशाप्रकारे तुमची खमंग आणि कुरकुरीत चकली तयार झाली आहे.

पहा व्हिडिओ : मुंबईची चमचमीत पावभाजी घरच्या घरी कशी बनवाल?

या रेसिपी वाचल्यात का? 

Back to top button