Khanapur waterfall : पाऊले चालती पश्चिम घाटाची वाट : खानापूर तालुक्यातील धबधबे प्रवाहित; तिथे कसे जाल?

Khanapur waterfall : पाऊले चालती पश्चिम घाटाची वाट : खानापूर तालुक्यातील धबधबे प्रवाहित; तिथे कसे जाल?
Published on
Updated on

खानापूर : वासुदेव चौगुले : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील बहुतांश धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचे हे रूप डोळ्यांत साठवण्यासह जलधारांमध्ये चिंब होण्यासाठी पर्यटकांची पावले पश्चिम घाटाची वाट चालू लागली आहेत. वनखात्यानेही बंदी मागे घेतल्याने यंदा पर्यटकांच्या आनंदाला पारावर राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

माणजवळील सिम्बॉला वझर.
माणजवळील सिम्बॉला वझर.

पावसाचे उशिरा आगमन झाल्याने जून अखेरपर्यंत धबधबे प्रवाहित झाले नव्हते; पण गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसाला सुरवात झाल्याने सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून चिंब पावसात भिजण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांची धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. स्फटिकासारख्या शुद्ध पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी शेकडो पर्यटक सर्व अडथळे पार करुन धबधब्याच्या ठिकाणी पोहोचत आहेत. बेळगाव-गोवा असा चोर्ला मार्गे प्रवास करणारेही मनमोहक सृष्टीसौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी घाटमाथ्यावर थांबत आहेत. चोर्ला घाटातील लाडकीचा धबधबा, कर्नाटकातून गोव्याच्या हद्दीत कोसळणारा सुरलचा धबधबा, पारवाड-चिखले रस्त्यावरील सवतुरा आणि देऊची न्हय धबधबा, म्हातारीचा धबधबा, सडा येथील धबधबा असे अनेक लहानमोठे धबधबे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. या सर्वच धबधब्यांचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य आहे.

सडा गावाजवळील धबधबा.
सडा गावाजवळील धबधबा.

चोर्ला घाटातील लाडकीच्या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील पाण्याचा प्रवाह गोवा राज्यात झेपावतो. हा धबधबा चोर्ला घाटातून गोव्याला जाताना उजव्या बाजुस लागतो. चोर्ला महामार्गावरुन हा धबधवा सहज दृष्टीस पडतो. केवळ धबधबाच नाही तर या परिसरातील डोंगरदर्‍या, त्यावर पसरणारे दाट धुके पर्यटकांना निसर्गाच्या प्रेमात पाडणारे आहे. सुरलचा धबधबा पाहण्यासाठीही पर्यटकांची अशीच गर्दी उसळत आहे. सुरल गावातून एक कि.मी. अंतरावरील डोंगरावरुन या धबधब्याचे रौद्ररुप न्याहाळता येते. चिगुळेतील व्हॅली पॉईंटवर दाट धुक्यात हरवणारे माऊली मंदिर व येथील रमणीय परिसराची अल्हाददायक अनुभूती घेण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचे जथ्थे दाखल होत आहेत.

चिखले-पारवाड रस्त्यावरील सवतुरा धबधबा.
चिखले-पारवाड रस्त्यावरील सवतुरा धबधबा.

वर्षा पर्यटनाचा सुरुवातीचा काळ असल्याने वनखाते व पोलिसांकडून पर्यटकांची सध्या तरी अडवणूक होत नाही; पण मद्यपान, गोंगाट, प्लास्टिकचा वापर, हुल्लडबाजी आणि अस्वच्छता यासारखे प्रकार दिसून आल्यास स्थानिक सहन करणार नाहीत.
– दत्ता गावडे, पारवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news