Flamingo : फ्लेमिंगो झाला आता भारतीय !

Flamingo
Flamingo
Published on
Updated on

अलिबाग, जयंत धुळप : सैबेरीयन फ्लेमिंगो (Flamingo) पक्षी हे भारतातच स्थायिक होत असल्याचा नवा अभ्यास जीपीएस रेडिओ टॅगिंगमधून पुढे आला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी नवी मुंबई ते कच्छ हा 800 कि.मी.चा प्रवास केला असून, 6 पक्षांच्या लोकेशन ट्रॅकिंगमधून पुढे आला आहे.

फ्लेमिंगो (Flamingo)हे पक्षी यापूर्वी 7 हजार कि.मी.चा प्रवास करून दरवर्षी हिवाळ्यात महाराष्ट्रात दाखल होत असत. मात्र, अलीकडे 10 वर्षांत या पक्ष्यांचा प्रवास बदलला आहे. यातील जवळपास 5 हजार पक्षी हे या भागात स्थायिक झाल्याचे चित्र आहे, तर बाकीचे पक्षी स्थलांतरित होते. या भागात येणार्‍या फ्लेमिंगोंची संख्या जवळपास अडीच लाख एवढी आहे. मात्र, यातील स्थलांतरित होणारे पक्षी हे गुजरात, महाराष्ट्रातच येत असल्याचे पुढे आले आहे. जानेवारी ते एप्रिल 2022 या दरम्यान जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग करण्यात आलेले 'खेंगरजी तसरा', 'लेस्टर', 'मॅककॅन', 'सलीम', 'हुमायूं' आणि 'नवी मुंबई' हे सहा फ्लेमिंगो गेल्यावर्षी 16 ते 34 तासांचा हवाई प्रवास करून गुजरातमधील कच्छच्या अभयारण्यात पोहोचल्याची नोंदी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत.

यंदा कच्छ आणि भावनगर परिसरातील पाणथळीच्या जागांवरील पाणी आणि खाद्य तेथे विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने हे सहाही फ्लेमिंगो अद्याप तेथेच मुक्कामी आहेत. त्यांनी अद्याप ठाणे, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केलेला नाही. ते पुढील दोन महिन्यांत येणे अपेक्षित आहे, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक तथा पक्षी संशोधक डॉ. राहुल खोत यांनी दिली.

दरम्यान, अन्य फ्लेमिंगो (Flamingo) मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा पाऊस लांबल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दाखल झाले आहेत. दरवर्षी सुमारे तीन लाखांच्या आसपास फ्लेमिंगो येथे येत असल्याचे डॉ. खोत यांनी सांगितले.

भारतामध्ये फ्लेमिंगो (Flamingo) पक्ष्यांचेे प्रजनन आणि स्थलांतर याबाबत पक्षी संशोधक आणि अभ्यासकामंध्ये मोठे औत्सुक्य आहे. देशातील प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या ठिकाणी फ्लेमिंगोंच्या स्थलांतराचे रहस्य शोधण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राज्यात प्रथमच मुंबई येथे सॅटेलाईट टेलिमेट्री अभ्यासाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत सहा फ्लेमिंगोंना सौर ऊर्जेवर चालणारे 'जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग' लावण्यात आले आहेत.

ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य हे सुमारे अडीच लाख स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे. सप्टेंबर ते मे या कालावधीत सुमारे 1.3 लाख फ्लेमिंगो येथे येतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने ठाणे क्रीक फ्लेमिंगो (Flamingo) अभयारण्यातील लेसर आणि ग्रेटर फ्लेमिंगोंचे स्थलांतर आणि अधिवास वापराचे नमुने समजून घेण्यासाठी सॅटेलाईट टेलिमेट्री अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती सुचविल्या.

जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत उच्च-भरतीच्या ठिकाणी सहा फ्लेमिंगो पकडले आणि त्यांना सौर ऊर्जेवर चालणारे 'जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग' लावले. उपसंचालक डॉ. पी. सथियासेल्वम आणि शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांच्यासह बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या चमूने ही कामगिरी केली. या अभ्यासाद्वारे मिळालेली माहिती पक्ष्यांचे स्थलांतर आणि 'सेंट्रल एशियन फ्लायवे' (Flamingo) मधील त्यांची स्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पारंपरिक पद्धतीचे फायदे अनेक असले तरीही त्याला मर्यादा आहेत, टेलिमेट्री टॅग ही यंत्रणा अचूक माहिती देते, असे डॉ.राहुल खोत यांनी स्पष्ट केले. जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग करण्यात आलेल्या या सहा फ्लेमिंगोंना (Flamingo) नावे देण्यात आली आहेत. सर्व फ्लेमिंगो ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत आहेत. राज्याच्या वनखात्याने या अभ्यास प्रकल्पाला परवानगी दिली. मुंबई महानगर विभाग विकास प्राधिकरणाने या अभ्यासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तर वन विभागाचा कांदळवन कक्ष या प्रकल्पाचे निरीक्षण करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news