

वॉशिंग्टन : पुरातत्त्व संशोधकांनी तब्बल 5 हजार वर्षांपूर्वीची फ्रीजर सिस्टीम शोधून काढली आहे. तिथे मद्यनिर्मितीही होत होती असेही दिसून आले आहे. दक्षिण इराकमधील नसीरिया शहराच्या ईशान्य भागात करण्यात आलेल्या उत्खननात हे अवशेष दिसून आले.
याठिकाणी उत्खननात संशोधकांना एक भट्टी, काही बाकडे, एक मातीचा रेफ्रिजरेटर आदी वस्तू सापडल्या आहेत. तसेच याठिकाणी खाद्यपदार्थ ठेवण्याचे वाडगे आणि अन्य काही मातीची भांडी सापडली आहेत. या वाडग्यांमध्ये मासे व अन्य प्राण्यांच्या हाडांचे अवशेषही सापडले आहेत. तसेच तत्कालीन लोक अशा भांड्यांमधून मद्यपानही करीत होते हे दिसून आले. पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटी आणि पीसा युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या टीमने या अवशेषांचा शोध घेतला.
सुमेरियन संस्कृतीच्या काळातील हे ठिकाण आहे. या संशोधनामध्ये सहभागी असलेल्या हॉली पिटमॅन यांनी सांगितले की रेफ्रिजरेटरच्या मागे अन्न शिजवण्यासाठीची एक भट्टी किंवा ओव्हनही मिळाला. हे एक असे ठिकाण होते जिथे लोक खाण्या-पिण्यासाठी येऊ शकत होते. सुमेरियन लोक मद्यपानही करीत असत व मद्य कसे तयार करावे याबाबतची माहितीही तेथील एका दगडावर कोरलेली आढळली.