

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत असल्याचा आरोप 9 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला आहे. त्या पत्रातील पहिली सही माझी आहे. पंतप्रधानांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आमची इच्छा आहे. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आज (दि.६) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केजरीवाल सरकारमध्ये ज्या व्यक्तीने शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले आणि अनेकांनी कौतुक केले त्यांना अटक केली जात आहे. अशा अटकेची अनेक उदाहरणे असल्याचे पवार यांनी सांगितले. कसबा निकालाबाबत बोलताना ते म्हणाले, धंगेकरांच्या यशाबद्दल मला खात्री नव्हती. भाजप व्यतिरिक्त मतदार गिरिष बापट यांच्यासोबत होता. निवडणूक झाल्यानंतर मी माहिती घेतली, काही अपेक्षा न ठेवता लोकांची कामे करणारा उमेदवार असल्यानं त्यांना मतदारांनी मते दिली. त्यासोबत महाविकास आघाडी एकत्र लढल्याने कसबा येथील विजय झाला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढवावी लागेल. महाराष्ट्रात फिरत असताना लोक सांगतात की, बदल हवाय आणि या बदलासाठी सर्वांनी एकत्र यावं अशी लोकांची भावना आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेला एक प्रयत्न राहणार, महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्र ठेवणे व एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणे याची काळजी घेतली जाईल. पैशांचा वापर हे लोक मान्य करत नाहीत, हे झालेल्या पोटनिवडणुकीतून दिसले. सगळे एकत्र आल्यास काय होणार आहे. हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेतील उपस्थितून स्पष्ट झालं" असे पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आलेल्यांची चौकशी बंद झाली, असे एकतरी नाव सांगा असे आवाहन केले होते. यावर बोलताना पवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील एका भाजपच्या नेत्याने प्रश्न विचारला की, ज्याच्यावर केस होती आणि नंतर चौकशी झाली नाही असे नाव दाखवा. त्याला उत्तर मीच दिलं की, ठाणे जिल्ह्यात कोण होतं, कुणाला अटक करण्याचा निर्णय झाला होता, ते सांगा. अकोला, वाशीममध्ये चौकशी झाली होती, ती आज चालू आहे का तेही सांगा, अशी अनेक नावे सांगता येतील," असे पवार यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांनी हिंदूस्थानात लोकशाहीची चिंता करावी, अशी स्थिती तयार होत आहे. त्यात चुकीचं काय, त्यांनी त्यांच मत सांगितलं, असेही ते म्हणाले.