सांगली श्री गणेशाची नगरी – संस्थान गणपती

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

सांगलीचे ग्रामदैवत श्री गणेश आहे. सांगलीतील श्री गणेश मंदीर प्रसिद्ध आहे. उत्तम वास्तूकलेचा नमुना म्हणून या मंदिराची प्रसिद्धी आहे. कोणताही नवा उपक्रम किंवा व्यवहार श्री गणेशाच्या दर्शनाशिवाय करायचा नाही, असा इथला रिवाज आहे. या संस्थानचे नावच श्री गणपती संस्थान( सांगली) असे आहे. सुुमारे दोनशे वर्षे या देवस्थानासमोर हत्ती झुलत होता.

देशातील मोजक्या स्वायत्त आणि संपन्न देवस्थानांपैकी ते एक. सांगली संस्थान गणपतीचा उत्सव पाच दिवसांचा असतो. गणेशोत्सातील पाचव्या दिवशी पूर्वी पालखीतून श्रींची मिरवणूक निघत असे. मिरवणुकीच्या अग्रभागी संस्थानचा हत्ती असे. सायंकाळी कृष़्णा नदीवरील सरकारी घाटावर विसर्जन होत असे. गेल्या काही वर्षांत श्रींची विसर्जन मिरवणूक रथातून निघते आणि सरकारी घाटावरच विसर्जन होते.

सांगलीतील सार्वजनिक गणेशोत्सव सात, नऊ आणि अकरा दिवसांचा असतो. प्रत्येक मंडळ त्यांच्या प्रथा व परंपरेप्रमाणे श्री विसर्जनाची मिरवणूक त्या त्या दिवशी मोठ्या थाटात काढते. बहुसंख्य घरगुती गणपती मात्र पाचव्या दिवशीच विसर्जित होतात. संस्थानचे दैवतच श्री गणेश असल्यामुळे गेली सुमारे सव्वादोनशे वर्षे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होता. महापूर आणि कोरोनाचे संकट हे अपवाद.

सांगलीकर पटवर्धन संस्थानिकांच्या चार पिढ्यांच्या कारकीर्दीत सुमारे दोनशे वर्षांच्या कालावधीत श्री गणेश मंदिराची उभारणी पूर्ण झाली आहे. संस्थानचे संस्थापक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी इ.स. 1820 च्या सुमारास या मंदिराची उभारणी सुरू केली होती.

उभारणीनंतर त्यांच्याच हस्ते इ.स. 1844 मध्ये महापूजा झाली होती. त्यानंतर श्रीमंत धुंडिराज तात्यासाहेब , चिंतामणराव आप्पासाहेब यांनी मंदिरात आणखी काही सुविधा निर्माण केल्या. श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यांनी या ऐतिहासिक मंदिराचे स्वरूप आणखी सुंदर आणि शोभिवंत केले आहे.सांगली जिल्ह्यातील तासगाव हीसुद्धा श्री गणपतीची पांढरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्या संस्थानचे संस्थापक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तेथील श्री गणपती मंदिर बांधले.

इ.स. 1799 च्या सुमारास या मंदिराची उभारणी पूर्ण झाली. दक्षिणेतील गोपूर पद्धतीने तासगावमधील या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. तासगावमध्ये संस्थान गणपती दीड दिवसांचा आहे. त्यामुळे तिथे दुसर्‍या दिवशी श्री गणेशाचा रथोत्सव होतो. रथातून श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक भाविकांच्या प्रचंड गर्दीत आणि थाटामाटात निघते. सांगली-हरिपूर रस्त्यावरील बागेतील श्री गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे. सांगलीतील श्री गणेश मंदीर आणि तासगावमधील श्री गणेश मंदिराच्या तुलनेत बागेतील हे मंदीर जुने आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news