मा. श्री. नरेंद्रजी मोदी ऊर्जावान, चैतन्यदायी नेतृत्व

मा. श्री. नरेंद्रजी मोदी ऊर्जावान, चैतन्यदायी नेतृत्व

एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र

देशाचे पंतप्रधान आणि आदरणीय नेते नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुरुवातीला मी अभीष्टचिंतन करतो तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. कार्यकर्ता या नात्याने सुरुवात केलेले ना. मोदीजी पुढे मुख्यमंत्री आणि आता देशाचे पंतप्रधान झाले आहेत. या त्यांच्या कारकिर्दीत त्यांना आलेले अनुभव विलक्षण आहेत. त्यांची ही कारकीर्द आपण सर्वांनी पाहिली आहे. या अनुभवातूनच त्यांचे पोलादी, कणखर आणि तेजस्वी नेतृत्व घडले आहे.

ना. मोदी आणि माझी ओळख खूप आधीची आहे. युतीच्या अगदी सुरुवातीपासूनच मोदीजी महाराष्ट्रात येत. त्या वेळी त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग मला आला होता. आमचे स्फूर्तिस्थान, हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मोदीजींचे जवळचे संबंध होते. मोदीजींना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. ते बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा अजूनही उल्लेख करतात. मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील 2009 च्या प्रचार दौर्‍यात भाग घेतला होता. माझ्याकडे त्यांच्या त्या वेळच्याही आठवणी आहेत. त्यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. त्यांची कार्यशैली, ऊर्जावान, चैतन्यदायी व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेलो होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे आणि मोदीजी यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक साम्यस्थळे आहेत. त्या दोघांच्या कार्यशैलीची चुणूकही मला मोदीजी यांच्या कामात जाणवते.

बाळासाहेब आज हयात असते, तर त्यांनी मोदीजींचे त्यांच्या कामाबद्दल खूप कौतुक केले असते. बाळासाहेबांनी आपली हिंदुत्वाची विचारधारा प्रयत्नपूर्वक जतन केली आणि वाढवली. त्यांची विचारधारा आम्ही कटाक्षाने अमलात आणली. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून तर बाळासाहेबांची प्रतिमा आणखी तेजस्वी झाली. राम मंदिराचे बांधकाम आता होते आहे. त्यामागे मोदीजी यांची धोरणी भूमिका, मुत्सद्देगिरी आहे, हे बाळासाहेबांनीही मान्य केले असते. 'मी जर पंतप्रधान झालो, तर काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द करेन' असे बाळासाहेब बिनदिक्कत म्हणत. आता तर हे कलम रद्दही झाले आहे. ते रद्द करण्याची किमयाही मोदीजी यांनी लीलया करून दाखवली आहे. मग अशा या आपल्या पंतप्रधानांचे मुंबईतील स्वागत कसे झाले असते, याची कल्पना करा. मोदीजींच्या स्वागतासाठी बाळासाहेबांनी आपल्या खास पद्धतीने अभिनंदन सोहळा केला असता. गुजरात राज्याचा धडाक्याने विकास झाला तो मोदीजी मुख्यमंत्री असताना. त्यांनी आपल्या विशाल आणि व्यापक अशा विकासदृष्टीचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गुजरात आता समृद्ध झाला आहे. त्या राज्याच्या विकासात त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे.

गुजरातचे विकासाचे मॉडेल हे मोदीजींचे मॉडेल आहे. शेती, उद्योग तसेच इतरही अनेक क्षेत्रांत त्यांनी दिशादर्शक ठरतील अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली. हे प्रकल्प मोदीजी यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभे आहेत. ते प्रकल्प पुढील काळासाठी आदर्श ठरतील, असे मला प्रामाणिकपणे वाटते. माझ्या संघर्षातील वाटचालीची आणि मोदीजींच्या वाटचालीची मी अनेकदा तुलना करतो. त्या वेळी मला त्यांच्या आणि माझ्या वाटचालीत समान मुद्दे असल्याचे जाणवते. त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षातूनच मोदीजी अधिक कणखर आणि दुर्दम्य आशावादी बनले, असे मला राहूनराहून वाटते. तसेच आघात आणि संघर्ष यांचा सामना मलाही करावा लागला होता. तथापि, धर्मवीर दिघे यांच्या समर्थ नेतृत्वाचे पाठबळ मला मिळाल्याने मी सावरलो. बाळासाहेब, धर्मवीर दिघे तसेच मोदीजी यांच्याकडून मला स्फूर्ती मिळाली आहे. आपली नजर भव्य-दिव्य गोष्टींकडे ठेवावी; पण पाय जमिनीवरच ठेवावेत, ही गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो. त्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करायची असेल अथवा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते राष्ट्राला समर्पित करायचे असेल, अशा वेळी मोदीजी त्या कामावरील मजूर, कामगार-कष्टकर्‍यांची जाणीव ठेवतात, त्यांच्याशी बोलतातही. त्यांनी केलेल्या कामाचा गौरवाने उल्लेखही ते करतात. त्याचप्रमाणे त्यांचा योग्य तो सन्मानही करतात. आतापर्यंतच्या नेत्यांनी असे कधी केलेले मला दिसले नव्हते. मोदीजींचे वेगळेपण हे असे आहे.

माझ्या आयुष्यात अनेकदा मोदीजींना भेटण्याचे योग आले. त्याचा पुन्हा तपशील देण्याची गरज नाही. कारण, त्यांची तुम्हा सर्वांना माहिती आहे. मला आता त्यांचे थेट मार्गदर्शन मिळते. माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून अनुभवी, धडाकेबाज नेते काम करीत आहेत. ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मी आणि देवेंद्रजी जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा मोदीजींना हव्या असलेल्या विकास प्रकल्पांचा जाणीवपूर्वक उल्लेख करतो. मोदीजींबरोबर झालेल्या आतापर्यंतच्या भेटींमधून, त्यांच्याशी झालेल्या बोलण्यांमधून त्यांची देश आणि तळागाळातील प्रत्येक घटकाविषयी असलेली तळमळ मला जाणवत राहिली. त्यांच्या बोलण्यात देश आणि देशातील प्रत्येक गोष्टीचा विकास याचाच ध्यास हाच होता. विशेषतः विकासाचा हा रथ आपल्या सर्वांनी सांघिक प्रयत्नांतून पुढे न्यायचा आहे, हे त्यांनी ठासून सांगितलेले म्हणणेही लक्षात राहिले. मला सगळ्यांत आवडली ती मोदीजी यांची कार्यशैली. मला नेहमीच पत्रकार आणि जवळची मंडळी विचारतात, 'तुम्ही रात्र-रात्र आणि पहाटेपर्यंत काम करता, त्यामागे रहस्य काय?' तर यात पंतप्रधान मोदीजी यांच्या कार्यप्रवण, सदैव ऊर्जेने भारलेल्या कार्यशैलीची प्रेरणा हे एक कारण निश्चितच आहे, हे प्रांजळपणे सांगतो. मोदीजी यांच्याकडे धडाडी तर आहेच, पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची दृढनिश्चयी वृत्तीही आहे. लंब्याचौड्या बैठका, आढाव्यापेक्षा त्यांची भिस्त फलनिष्पत्ती होऊ शकणार्‍या गोष्टींवर असते. त्यामुळे बैठकांचे आणि चर्चा अघळपघळ न होता, त्यातून लगोलग निर्णय घेतले जातात. प्रभावी अशी अंमलबजावणी सुरू होते. या सगळ्या गोष्टीचे प्रतिबिंब आपण डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, गंगा नदीची स्वच्छता, अशा अनेक आणि कित्येक प्रकल्पांमध्ये पाहू शकतो. आत्मनिर्भर भारत असो की आपल्या संरक्षण दलाची सज्जता, या सगळ्या आघड्यांवर मोदीजी यांनी आपल्या नेतृत्वगुणाचा जगाला परिचय करून दिला आहे. जगभरातील अनेक बलाढ्य देशांना आणि त्यांच्या नेतृत्वाला, तेथील नागरिकांना मोदीजी यांच्याविषयी अप्रूप आहे, कुतूहल आहे आणि ते दिवसेंदिवस वाढते आहे, हे आपण पाहतोच.

एकविसाव्या शतकाच्या उदयाबरोबरच आपल्या देशाला पंतप्रधान मोदीजी यांच्यासारखे नेतृत्व लाभले आहे. देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. अशा वेळी आपल्या सर्वांसाठी आणि खंडप्राय देशासाठी हा स्वर्णीम आणि अमृतयोग आहे, असेच म्हणावे लागेल. उत्तरोत्तर मोदीजी यांचे नेतृत्व बहरत जाईल. त्यांच्या प्रखर देशाभिमान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वातील पैलूंनी देश, जगाचे क्षितिजही उजळून निघेल, असा विश्वास आहे. या शब्दांसह पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभीष्टचिंतन करतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने, माझ्या वतीने मोदीजींना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार !

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news