

सध्या जगात ऊर्जेची कमतरता आहे. पर्यायी ऊर्जा स्रोत म्हणून सौर ऊर्जा ही प्रचलित होत आहे. सौर ऊर्जेची गरज आणि व्यापकता दिवसेंदिवस वाढत असताना या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार उपयुक्त ठरू शकतो. सोलर पॅनल इन्स्टॉलर हे सौर ऊर्जा क्षेत्रात नव्याने उभारी घेणारा करिअरचा पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही.
सूर्यापासून थेट मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा होय. आपल्याला दोन प्रकारे सौर ऊर्जा मिळते. पहिले म्हणजे प्रकाश-विद्युत सेलच्या मदतीने आणि दुसरे म्हणजे सूर्याच्या उष्णतेच्या मदतीनेे पातळ पदार्थ गरम करणे आणि त्यानंतर विद्युत यंत्र कार्यान्वित करणे. बाजारात अनेक सोलर यंत्र असून ते वीज बिल कपातीसाठी फायदेशीर ठरत आहेत. जगभरात सौर ऊर्जा उद्योग आणि क्षेत्र वेगाने वाढत चालले आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात रोजगाराचा वृद्धी दर हा 20 टक्के राहिला आहे. आता सौर ऊर्जेची मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक आहे. सौर उद्योगात कौशल्यप्राप्त युवकांची नेमणूक केल्यास मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर होऊ शकते.
पर्यावरणाशी निगडित ऊर्जा हे डायनॅमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या क्षेत्राचा करिअरच्या दृष्टीने देखील विचार करता येऊ शकतो. ऊर्जेचा हा स्रोत मानवासाठी लाभदायी ठरत आहे. पेट्रोल, डिझेल आदी पारंपरिक स्रोतांच्या तुलनेत पर्यावरणपूरक आणि सुरक्षित स्रोत म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिले जाते. आजघडीला आपल्या परिसरात, रस्त्यावर, कारखान्यावर, उंचच उंच इमारतींवर सोलर पॅनल दिसून येत असतील. सौर ऊर्जेची मागणी वाढत चालली आहे, तसतशी या क्षेत्रात करिअरची संधी देखील वाढत चालली आहे. सोलर पॅनल इन्स्टॉलर हे सौर ऊर्जा क्षेत्रात नव्याने उभारी घेणारा करिअरचा पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही.
सोलर पॅनल इन्स्टॉलर व्हा
या क्षेत्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वातावरण राखण्याबरोबरच आपण लाखो रुपयांची कमाई देखील करू शकतो. या क्षेत्रात अनुभव, नोकरीचे ठिकाण आणि सद्य:स्थितीची अर्थव्यवस्था यावर उत्पन्न अवलंबून असते. यासाठी सखोल जाण्याची गरज नाही. मात्र इलेक्ट्रॉनिकमध्ये आवड असणे तितकेच महत्त्वाचे आहे. यांत्रिक कौशल्ये अवगत करून किचकट विद्युत आणि यांत्रिक उपकरणांबरोबर काम करण्याची आवड असावी लागते.
सोलर पॅनल इन्स्टॉलर होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये सौरऊर्जा तंत्रज्ञानाची माहिती, सुरक्षेबाबतची माहिती, पायाभूत गणिताचे ज्ञान, शारीरिक क्षमता, चिकाटीचा समावेश होतो.
सोलर पॅनल क्षेत्रात काम करण्यासाठी आपली क्षमता आणि प्राथमिक गणिती कौशल्य हे आपली बर्यापैकी मदत करू शकतात. सौर ऊर्जा क्षेत्रात आपण विविध पदांवर काम करून दरमहा 20 ते 70 हजार रुपये उत्पन्न मिळवू शकता. या क्षेत्रात सोलर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणूनही काम करता येईल.
सौर ऊर्जा क्षेत्रात काम करण्यासाठी विशिष्ट पदवीची गरज फायदेशीर ठरत असली ती अनिवार्य आहे असे नाही. काही दिवसांचे प्रशिक्षण घेऊनही या क्षेत्रात काम करता येईल. अशा प्रकारचे प्रशिक्षण अनेक संस्था उपलब्ध करून देतात.
जान्हवी शिरोडकर