आंतरजाल बनले मायाजाल 

आंतरजाल बनले मायाजाल 
Published on
Updated on

विनायक राजाध्यक्ष

स्मार्टफोनचे व्यसन ही वैयक्‍तिक समस्या नाही. विशेषतः तरुण विद्यार्थी स्मार्टफोनच्या व्यसनामुळे गंभीर गोष्टी करण्यामध्ये अधिकाधिक गुंतू लागले आहेत. खरे तर विविध संस्था, सरकार यांनी नॅशनल लेव्हलवर स्मार्टफोनच्या व्यसनातून मुक्‍त किंवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे उपाय शोधणे गरजेचे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा व्यसनाधीन व्यक्‍तींना मदत करण्यासाठी विविध मानसिक उपचारांना मान्यता देण्याची गरज आहे.

इंटरनेट … एकेकाळी ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहेत तेच वापरत होते. इंटरनेट नवीन होते, त्याचे अप्रूप होते. लोक वापरायला लागली. वापरायचे प्रमाणे इतके वाढले की, त्याचे जणू व्यसनच लागले. त्यानंतर जसे स्मार्टफोन लाँच झाले आणि इंटरनेटचे पर्यायाने स्मार्टफोनचे व्यसन वाढीस लागले. त्याचे गंभीर परिणाम लोकांवर, समाजावर होऊ लागले. पोर्टेबल मीडिया प्लेअर, हाय स्पीड वाय-फाय, मल्टी युझर मोबाईल सिस्टीम यांसारखे स्मार्टफोन व त्याचा सोयीस्कर वापरामुळे या व्यसनामध्ये भर पडली आहे किंबहुना ती वाढत चालली आहे. हातात असलेला स्मार्टफोन कॉम्युटरपेक्षा अधिक सहज आणि सोप्या पद्धतीने वापरला जात आहे. त्यावर इंटरनेट वापरू शकतो. याचमुळे आज इंटरनेट, मोबाईल हे आता लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्‍तींपर्यंत व्यसनाचे एक कारण झाले आहे.
याचा परिणाम म्हणजे वाढते सायबर क्राईम. सायबर क्राईम आता विविध रूपाने समोर येऊ लागले आहेत. यामध्ये आयडेंटी थेफ्ट वाढली आहे. म्हणजे त्या व्यक्‍तीची डिजिटल आयडेंटी. जसे की फोन नंबर, पिन नंबर, ई-मेल आयडी, कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर, ग्रीड नंबर हे चोरण्याचे विविध मार्ग क्रिमिनल्स शोधत असतात. यामध्ये फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, डमस्टर डायविंग, फार्मिंगच्या आलेल्या लिंक्सद्वारे माहिती घेतली जाते. याचा वापर मग पैसे चोरण्यासाठी केला जातो.

याचबरोबर विविध सोशल प्लॅटफॉर्मवरील फोटो, व्हिडीओंच्या माध्यमातून बदनामी करणे, धमकी देणे असे घडू लागले आहे.
विशेष करून महिलांच्या बाबतीत असे गुन्हे घडत आहेत. विवाहाचे आमिष दाखवून, मोठी परदेशी नोकरी आहे असे सांगून ही फसवणूक केली जाते. फसवण्यासाठी मैत्री करणे, प्रेम करतो म्हणून खोटे सांगून व्हिडीओ कॉल करणे, ते रेकॉर्ड करणे व त्या रेकॉर्डिंगचा वापर करून धमकी देणे, बदनामी करणे असे उद्योगही सुरू आहेत.

हे कमी आहे म्हणून की काय ऑनलाईन बाललैंगिक शोषण सुरू झाले आहे. लहान मुलांना ऑनलाईन माध्यमातून फूस लावून किंवा घाबरवून अश्‍लील व्हिडीओ तयार करण्यासाठी दबाव आणणे, असे सर्रास होऊ लागले आहे. दुर्दैवाने अशा घडलेल्या घटनांची पोलिस तक्रार केली जात नाही.

दुसरे म्हणजे इंटरनेट व्यसन. इंटरनेट व्यसनाचे सामान्य स्वरूप म्हणजे गेम्स, चॅट, पिक्चर पाहणे, पोर्नोग्राफी. स्मार्टफोन आले त्याची सहज उपलब्धता, सोशल कनेक्ट होण्याची सहज सोपी पद्धत, इंटरनेटची सहज उपलब्धता व कोणत्या विषयानुसार मिळणारा आधार, त्यात भर म्हणून सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म यामुळे या व्यसनात भर पडली आहे.

अर्थात स्मार्टफोनचे व्यसन ही वैयक्‍तिक समस्या नाही. विशेषतः तरुण विद्यार्थी स्मार्टफोनच्या व्यसनामुळे गंभीर गोष्टी करण्यामध्ये अधिकाधिक गुंतू लागले आहेत. खरे तर विविध संस्था, सरकार यांनी नॅशनल लेव्हलवर स्मार्टफोनच्या व्यसनातून मुक्‍त किंवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे उपाय शोधणे गरजेचे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा व्यसनाधीन व्यक्‍तींना मदत करण्यासाठी विविध मानसिक उपचारांना मान्यता देण्याची गरज आहे.

व्यसनाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ड्रग, अल्कोहोल, तंबाखू, सिगारेट यांसारखे व्यसन आणि दुसरे म्हणजे गेम, इंटरनेट, अगदी स्मार्टफोन. दुर्दैवाने इंटरनेट, स्मार्टफोनचे व्यसन हे पटकन लक्षात येत नाही. काही गुन्हा घडला, गुन्ह्यामध्ये अडकले की लक्षात येते की आपण याच्या आहारी गेलो आहोत ते. स्मार्टफोनच्या बाबतीत, थोडे संशोधन केले गेले आहे. इंटरनेट, स्मार्टफोन व्यसनाचे अनेक पैलू आहेत. या व्यसनाचे निकष ठरवताना सर्व बाजूने विचार करणे आवश्यक आहे.

स्मार्टफोन, इंटरनेट व्यसन ही समस्या दर्शविणारी एक व्यापक बाब आहे. सायबर सेक्श्युअल व्यसन, सायबर रिलेशनशिप व्यसन, इंटरनेटची सक्‍ती, माहिती ओव्हरलोड आणि इंटरअ‍ॅक्टिव्ह कॉम्प्युटर गेमचे व्यसन. स्मार्टफोन, इंटरनेट व्यसनाच्या लक्षणांमध्ये मानसिक ताण, अनैसर्गिक वागणे, सामाजिक दुरावा, कौटुंबिक कलह, घटस्फोट, शैक्षणिक अपयश, नोकरी गमावणे आणि कर्ज यांचा समावेश होतो.

सामान्यत: ज्या लोकांमध्ये नैराश्य, एकाकीपणा, सोशल अ‍ॅनेक्स्टी, भावनावश असणे, विचलितता, चिडचिडपणा, फोन काढून घेतल्यानंतर आलेला मानसिक ताण व आक्रस्ताळेेपणा यांसारख्या बाबी दिसून आल्यास त्यांना स्मार्टफोन, इंटरनेटचे व्यसन आहे, असे समजावे. तसेच इंटरनेट वापरण्याची जागा, इंटरनेट वापरण्याची वेळ, समवयस्क नातेसंबंध, पालकत्वाची पद्धत या गोष्टीही या व्यसनाशी संबंधित आहेत व अशा गोष्टी हे व्यसन वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

इतकेच नाही तर स्मार्टफोनमुळे काही शारीरिक समस्याही ओढवतात. जसे की डोळे कोरडे पडणे, हाताच्या आणि बोटामध्ये सुन्नपणा आणि मुंग्या येणे, बोटांची, मानेची हालचाल करताना दुखणे, स्नायूला इजा होणे, मनगट, मान, पाठ आणि खांदे, मायग्रेन (डोकेदुखी) आणि अंगठा आणि तर्जनी आणि मधल्या बोटांमध्ये सुन्नपणा आणि वेदना यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत.

मग या दोन्ही बाबी म्हणजे सायबर क्राईम किंवा इंटरनेट स्मार्ट फोनचे लागलेले व्यसन याचे निराकरण कसे करणार. अशा लोकांना यातून बाहेर कसे काढणार. यासाठी अशा लोकांना समुपदेशन, तांत्रिक सहाय्य देण्याची आवश्यकता आहे. सांगलीतील काही सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ व सायबर सिक्युरिटी अभ्यासक आहेत. त्यांनी व काही मानसिक समुपदेशकांनी एकत्र येऊन सायबर वेलनेस सेंटरची संकल्पना मांडली. सध्या सांगलीमध्ये हे सायबर वेलनेस सेंटर सुरू केले आहे.

या सायबर वेलनेस सेंटरमध्ये मोबाईल इंटरनेटच्या अतिवापरामुळे घरच्या लोकांपासून दूर गेले आहेत, फक्‍त मोबाईल हेच त्यांचे विश्‍व झाले आहे किंवा मोबाईलमुळे लहान मुलांमध्ये ज्या समस्या उद्भवतात, या अशा सर्वांना मानसिक आधार व समुपदेशन दिले जाते. तसेच जर एखादी व्यक्‍ती एखाद्या गुन्हाची बळी ठरली असेल तर त्यांना तांत्रिक सल्लाही दिला जातो.

इतकेच नाही तर सायबर वेलनेस सेंटरने सायबर बाबत जागृती कार्यक्रम तयार केले आहे. ते विविध शाळा, महाविद्यालये येथे घेण्यात येत आहेत. एकूणच काय, जे काही ऑनलाईन व्यसन लागले आहे त्याला आता सायबर वेलनेस सेंटर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news