

अनुराधा चंद्रशेखर भडसावळे
anu.bhadsavle@gmail.com
अटलांटिक महासागराच्या अथांग निळ्या पाण्यात लोला नावाची एक किलर व्हेल तिचे कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि समुद्रातील इतर जीव यांच्यासोबत आनंदात राहत होती. चमकदार काळी पाठ, पांढरी शुभ्र छाती, डोळ्यांजवळचे पांढरे ठिपके आणि प्रचंड ताकद असलेली लोला समुद्रातील सगळ्यांच्या ओळखीची होती. तिचे विशाल शरीर पाण्यातून सरसर पुढे जायचे. श्वास सोडताना तिच्या डोक्यावरून उडणारा पाण्याचा उंच फवारा पाहण्यासारखा असे.
मधूनच ती पाण्याबाहेर उंच झेप घ्यायची. तिच्या त्या उड्यांनी मोठमोठ्या लाटा तयार व्हायच्या. जणू समुद्रात सर्वत्र संदेश जायचा - “लोला येतेय, बाजूला व्हा!” लोलाच्या झोपेचीही मोठी गंमत होती. ती कधी कधी एक डोळा उघडा ठेवून झोपायची. थोड्या वेळाने तो डोळा बंद करून दुसरा उघडा ठेवायची. याला “Unihemispheric slow-wave sleep” म्हणतात.
व्हेल सस्तन प्राणी असल्यामुळे त्या आपल्यासारख्याच फुफ्फुसांनी श्वास घेतात. त्यामुळे झोपेतही त्यांना अधूनमधून समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घ्यावा लागतो. म्हणून त्यांच्या मेंदूचा एक अर्धा भाग विश्रांती घेत असताना दुसरा अर्धा भाग जागा राहतो आणि श्वास घेण्याची काळजी घेतो. निसर्गाने दिलेली ही त्यांची किती अद्भुत व्यवस्था आहे ना! लोला खूप प्रेमळ होती. इतर व्हेल आणि समुद्रातील प्राण्यांबरोबर खेळायला, फिरायला तिला खूप आवडायचे. तिचे अनेक मित्र होते. डिडो नावाची एक हुशार डॉल्फिन तर तिची खास मैत्रीण होती.
पण काही दिवसांपासून लोला बदलली होती. ती कुणाशी बोलत नव्हती, खेळत नव्हती. शिकारीला जात नव्हती. जवळपास पंधरा दिवस ती एकटीच फिरत होती. कोणी जवळ आले की ती लगेच दूर निघून जायची. समुद्रातील प्राण्यांना वाटू लागले, “लोलाला आता तिच्या ताकदीचा आणि सौंदर्याचा गर्व झाला आहे. ती फार शिष्ट झाली आहे. तिला आता कुणाची गरज नाही.”
हळूहळू सगळ्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले. ती समोर आली की इतर मासे आपला मार्ग बदलू लागले. पण शंभर वर्षांच्या अनुभवी समुद्री कासवाला मात्र तसे वाटत नव्हते. तो म्हणाला, “लोला पूर्वी अशी नव्हती. तिची नक्की काहीतरी अडचण आहे. ती शोधायला हवी.”
डिडोने मग आपल्या मैत्रिणीवर लक्ष ठेवायचे ठरवले. एक दिवस तिने लोलाचा पाठलाग केला. तिला एक विचित्र दृश्य दिसले. लोला मोठ्या लाटेबरोबर किनाऱ्यावर जाऊन धडकत होती. वाळू तोंडात घेत होती आणि पुन्हा बाहेर टाकत होती. डिडो घाबरली.
“अशाने लोला स्वतःला इजा करून घेईल!” ती पटकन तिच्या जवळ गेली, पण अचानक तिला खूप वाईट वास आला. लोलाच्या श्वासालाही प्रचंड दुर्गंधी येत होती. हुशार डिडोच्या लक्षात आले. ती प्रेमाने म्हणाली, “लोला, खरं सांग. तुझ्या दातात काही अडकलंय का?”
लोलाचे डोळे भरून आले. तिच्या दातांमध्ये माशाचा काटा आणि काही अवशेष अडकले होते. त्यामुळे तिला खूप त्रास होत होता. तोंडाला येणाऱ्या वासाची तिला इतकी लाज वाटत होती की ती कुणाशी बोलण्याऐवजी सगळ्यांपासून दूर राहू लागली होती. डिडो हसून म्हणाली, “अगं लोला, एवढंच ना? आपण मासे खातो. असा त्रास कधी कधी कुणालाही होऊ शकतो. मदत मागायला कसली लाज? तोंड उघड पाहू.”
लोलाने मोठा आ वासला. डिडो तिच्या तोंडात शिरली आणि काही मिनिटांत तिने अडकलेले काटे व अवशेष काढून टाकले. लोलाचा त्रास संपला. तिचा आनंद परत आला. तिला समजले की मदत मागणे म्हणजे कमीपणा नाही. आपल्या अडचणी मनात लपवून एकटे पडण्यापेक्षा योग्य व्यक्तींवर विश्वास ठेवायला हवा. इतरांनाही एक गोष्ट समजली, कुणी अचानक शांत झाले, एकटे राहू लागले किंवा आपल्यापासून दूर जाऊ लागले तर तो गर्विष्ठ झाला असेलच असे नाही. कदाचित त्याच्या मनात एखादी काळजी असेल, त्याची काही अडचण असेल. म्हणून लगेच गैरसमज करून घेण्याऐवजी प्रेमाने विचारपूस करणे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते.
आपल्यालाही अनेकदा असेच होते. एखाद्या प्रोजेक्टमध्ये अडचण येते, वर्गात एखादा विषय किंवा एखादी गोष्ट नीट समजलेली नसते, मनात शंका असते; पण “बाकीच्यांना समजले आहे, मग मलाच कसे कळले नाही?”, “मी विचारले तर मला मूर्ख समजतील का?” अशा कल्पना मनात येतात आणि अनेक विद्यार्थी प्रश्न विचारायला लाजतात. पण न विचारलेली छोटीशी शंका पुढे मोठी अडचण बनू शकते. योग्य वेळी विचारलेला एक प्रश्न आणि घेतलेली थोडीशी मदत आपला मार्ग सोपा करू शकते.
कधी कधी शरीरातील वेदना, त्रास किंवा आजाराची लक्षणेसुद्धा “लोक काय म्हणतील?” या भीतीने किंवा लाजेखातर लपवून ठेवली जातात. पण वेळेवर सांगितलेली अडचण आणि योग्य वेळी घेतलेली मदत अनेकदा मोठे आजार किंवा संकटे टाळू शकते. त्या दिवसापासून लोला पुन्हा सगळ्यांमध्ये मिसळू लागली. तिने ठरवले, गरज पडली तर मदत मागायची आणि कुणाला आपली गरज असेल तर त्याच्यासाठी पुढे उभे राहायचे. कारण मदत मागणे ही कमजोरी नसते; ती स्वतःची काळजी घेण्याची आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याची खूण असते.
संदर्भ : पेड्रो साक्रीस्टेन यांच्या मूळ कथेवर आधारित