

Ukadiche Modak Recipe in Marathi
गणपतीचे वेध लागले की मूर्ती, डेकोरेशन यानंतर मोदकांची लगबग सुरू होते. बाप्पाला आवडणारा आणि खास लाडका मोदक कसा करावा याच्या अनेक रेसिपी आहेत. पण गणपतीदरम्यान प्रवास करणार असाल तर हे मोदक टिकवावेत कसे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यापूर्वी जाणून घेऊ उकडीच्या मोदकांची परफेक्ट रेसिपी.
साहित्य : (सारण )
ओला खोवलेला नारळ - एक वाटी
गूळ - पाऊण वाटी
काजू- बदाम आणि वेलची पावडर
खसखस
कढईत तूप टाका. ते तापले की त्यात ओले खोबरे, गूळ, काजू -बदाम आणि वेलची पावडर, खसखस टाका. एक सगळे मिश्रण छान एकजीव होऊ द्या. गरज वाटल्यास दुधाचा हबका मारा. गूळ विरघळला की दोन मिनिटे अजून गॅसवर ठेवून तो बंद करा.
व्यवस्थित उकडीसाठी एका पातेल्यात पाणी, तूप, दूध आणि चवीपुरते घाला. साधारण दीड वाटी पाण्याला एक वाटी पीठ इतके प्रमाण घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घालून मिसळून घ्या. सर्व मिश्रण योग्य प्रकारे एकजीव झाले की भांड्यावर झाकण लावा. पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा. उकड थोडी कोमट झाली की तेल-पाण्याचा हात लावून मळून घ्या. लिंबाच्या आकाराचा गोळा घ्या. त्याची पारी करून घ्या. पारी बोटाने वळून वळून पातळ करा म्हणजे खाताना पीठ पीठ लागणार नाही. त्याच्या बोटाने दाबून कळ्या करून घ्या. कळ्या त्याच्या टोकाला थोड्याश्या दाबा म्हणजे त्या एकसंध राहतील. त्यात सारण भरा. हलक्या हाताने सगळ्या कळ्या एकत्र आणत जोडा. शेंडयाला दाब द्या म्हणजे मोदक उघडणार नाहीत. 15 मिनिटे उकडून घ्या. मऊ, छान मोदक तयार आहेत. या प्रमाणात साधारण 8-9 मोठे मोदक नक्कीच होतात.
हो. दोन – तीन दिवसांपूर्वी उकडीचे मोदक टिकतील याबाबत फेसबुकवरील मुंबई स्वयंपाक घर या ग्रुपमध्ये काही युजर्सनी उपाय सांगितले आहेत. यातील सुयश पटवर्धन म्हणतात, समजा बुधवारी गणेश चतुर्थी आहे तर साधारण तीन दिवस म्हणजेच रविवारी रात्री मोदक करुन न वाफवता डीप फ्रीजमध्ये ठेवता येतात. गणेश चर्तुथीला इच्छित स्थळी पोहोचल्यावर मोदक वाफवून घ्यावेत. तर सुनील दाबके यांनी म्हटलंय की, दोन किंवा तीन दिवस अगोदरच वाफवून ठेवता येतील. यानंतर मोदक एअर टाईट डब्यात ठेवावा. तो डबा फ्रीजरमध्ये ठेवावा. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी इच्छित स्थळी पोहोचल्यावर १५ मिनिटे कुकर मध्ये शिटी न लावता वाफवून घेता येतील.