

आधार कार्ड पडताळणीसाठी फोटोकॉपीची गरज नाही
नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार
विमानतळावरही होणार वापर
Aadhaar Card New Rule For Hotel: देशातील नागरिकांच्या प्रायव्हसी आणि पर्सनल डिटेल्सच्या सुरक्षेसाठी UIDAI ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी नुकतेच सांगितले की नव्या नियमांचे नोटिफिकेशन लवकरच जारी करण्यात येईल. आधारच्या फोटोकॉपीच्या आधारे ऑफलाईन पडताळणी पूर्णपणे बंद करण्याचा नव्या नियमांचा उद्येश आहे.
नव्या नियमानुसार आता OYO असो वा कोणत्याही हॉटेलमध्ये आता आधार कार्डची फोटोकॉपी ओळख पडताळणीसाठी देण्याची गरज उरणार नाही. भुवनेश कुमार यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. प्राधिकरणाने नवे नियम मंजूर केले आहेत. याच्या अंतर्गत आता हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर सारख्या संस्थांना आधार कार्डवर आधारित पडताळणी करण्यासाठी आता नोंदणी करणं गरजेचं असणार आहे.
भुवनेश कुमार यांनी सांगितलं की नोंदणी केलेल्या संस्थांनाच आता नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाईल. त्याच्या अंतर्गत क्युआर कोड स्कॅन करून किंवा आधारच्या नव्या ॲपद्वारे तुम्ही आधार पडताळणी करू शकता. ऑफलाईन पडताळणी करणाऱ्या संस्थांना API (ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) उपलब्ध करून दिलं जाईल. या आधारे ते आपल्या सिस्टमला आधार तपासणीसाठी अपडेट करू शकतील. यासाठी UIDAI एक ॲपचे बीटा टेस्टिंग करत आहे. याद्वारे आधार पडताळणी ही सेंट्रल डेटाबेसशी न जोडता देखील करणे शक्य होईल. हे ॲप टू ॲप पर्यंतच मर्यादित असणार आहे.
UIDAI च्या मते, ओळखीचा पुरावा म्हणून आधारची फोटोकॉपी घेणे हे आधार कायद्याचे उल्लंघन आहे. आधारच्या या नवीन ॲपचा वापर आता विमानतळ (Airport), वय-प्रतिबंधित उत्पादने विकणाऱ्या दुकानांवर आणि इतर अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून करता येईल.
UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, हे नवीन ॲप व्हेरिफिकेशन प्रक्रिया सोपी आणि पेपरलेस (कागदविरहित) बनवेल. या नवीन प्रणालीमुळे वापरकर्त्यांची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित राहील आणि आधार माहिती लीक होऊन गैरवापर होण्याचा कोणताही धोका राहणार नाही.
हे नवीन ॲप आधार सर्टिफिकेशन सेवेला डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट नुसार तयार करेल. हा कायदा पुढील १८ महिन्यांत पूर्णपणे लागू होणार आहे.