चला पर्यटनाला : कास, बामणोली अन् किल्ले वासोटा : अनोखी अनुभूती

चला पर्यटनाला : कास, बामणोली अन् किल्ले वासोटा : अनोखी अनुभूती

Published on

बामणोली; नीलेश शिंदे :  जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठारासह बामणोली, वासोटा परिसर निसर्ग सौंदर्याची खाण म्हणून ओळखला जात असून, हा परिसर पर्यटकांना बारामहिने साद घालत असतो. कास पठारावरील फुलांचा हंगाम संपला असला, तरी कासचा तलाव पर्यटकांना खुणावत असून, बामणोलीच्या शिवसागर जलाशयातील सफर अनोखी अनुभूती देणारी आहे. याच मार्गावरील किल्ले वासोट्याचे ट्रेकिंग करताना समृद्ध जंगल व प्राणी जगताची नवी ओळख पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.

सातारा जिल्ह्यात आता बारमाही पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे. कोयनेचे पाणी कमी होऊ लागल्यानंतर पाण्यात आयलँड दिसू लागतात. या आयलँडवरही पर्यटकांची गर्दी होत असते. बामणोली, मुनावळे, शेंबडी येथील बोट क्लबच्या माध्यमातून पर्यटकांना बोट सेवा पुरवली जाते. येथून दिसणारा सूर्योदय, सूर्यास्त व पवनचक्क्या प्रकल्प ही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. कासच्या तलावाकाठी बसून निवांतपणे गप्पागोष्टी, पाण्यात मौजमस्तीचा आनंद पर्यटक घेत असतात.

किल्ले वासोटा हा अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावलीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. वासोटा किल्ला ट्रेकसाठी महाराष्ट्रभरातून ट्रेकर्स येत असतात. कोयनेच्या शिवसागर जलाशयातून बोटीने दीड तासांचा नयनरम्य प्रवास अ‍ॅमेझॉन खोरेची आठवण करून देतो; तर नंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात वसलेला वासोट्याचा डोंगर चढताना समृद्ध जंगल व प्राणी जगताची ओळख करून देत असतो.

कशी कराल ही अनोखी सफर…

सातारा शहरापासून कास पठार 25 कि.मी. अंतरावर असून, तिथून बामणोली सुमारे 10 कि.मी.चे अंतर आहे. सातारा ते बामणोली हा प्रवास निसर्गाच्या सान्निध्यात सुखद अनुभव देणारा आहे. बामणोली येथून किल्ले वासोटा येथे जाण्यासाठी बोटीतून दीड तासाचा प्रवास करावा लागतो. त्यानंतर पुढे किल्ला सर करण्यासाठी आणखी दीड तासाचे ट्रेकिंग करावे लागते. सातार्‍यातून बामणोलीपर्यंत एस.टी. बससेवा उपलब्ध आहे. सातार्‍यातून पहाटे 5.30 वाजता पहिली एस.टी. बामणोलीकडे रवाना होते. त्यानंतर दुपारी 12.30, 2.00 व सायंकाळी 5.30 असे बसेसचे वेळापत्रक आहे. महाबळेश्वर, तापोळा पर्यटन करणार्‍या पर्यटकांना तापोळ्यातून बोटीने बामणोली येथेही येता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news