शिराळा; विठ्ठल नलवडे : सांगली जिल्ह्याचा पश्चिम भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणारे चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी पर्वणीच. जवळपास 34 टीएमसीचा वसंत सागर जलाशयाचा नजारा तर पारणे फेडणारा. सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण म्हणजेच चांदोली आणि परिसर.
चांदोलीच्या उदरात खोल दर्या, उंच डोंगर, विस्तीर्ण सडे, प्रचंड वनसंपदा आणि या वनसंपदेच्या कुशीत बागडणारे असंख्य प्राणी. या वनस्पतीच्या अंगाखांद्यावर बागडणार्या शेकडो प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट, सदाहरित जंगल. भुरळ कायम! पाण्याचे अनेक स्रोत, चांदोलीमध्ये जंगल सफारी तर होतेच. त्याचबरोबर वन्यप्राण्यांचे दर्शनही. पर्यटकांसह वनसंपदा, पक्षी, प्राणी अभ्यासकांची संख्याही लक्षणीय. लोभस जैवविविधतेला तर तोड नाही. राज्याचा मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल या पक्षांचा अधिवास येथेच. बिबटे, गवे, सांबर, अस्वल, भेकर, रानडुक्कर, वानर, सायाळ, ससे, रानकुत्री, खवल्या मांजर, हरीण आदींचे हे हिरवे घर. गरुड, ससाने, खंड्या, घारी, भारद्वाज, पिंगळा, रातवा, सुबक स्वर्गीय नर्तक, पावशा, चातक, घुबड, सुतार पक्षी, बंड्या, रानकोंबड्या, कवडे, महा धनेश, राखी धनेश यांचे दर्शन मोहविणारेच. राष्ट्रीय पक्षी मोरांचे तर थवेच्या थवे भेटतात. लांडोर, कावळे कोकिळा, बगळे, पोपट, राघूही आहेत.
अगणित औषधी वनस्पती : बेहडा, हिरडा, पांगारा, आवळा, आपटा, वड, अडुळसा, कडूनिंब, शिकेकाई, नरक्या, अश्वगंधा, श्वेतागंधा, चंदन, वेती, माड, उंबर, तमालपत्र, शतावरी, सदाफुली, सर्पगंधा असे एक ना अनेक. संशोधनासाठी, औषधासाठी वापर होणार्या वनस्पती. झोळंबीच्या साड्यावर पावसाळ्यात शेकडो रंगीबेरंगी फुले जन्म घेतात; मात्र दमदार पाऊस कोसळत असल्याने त्याचा आनंद पर्यटक किंवा अभ्यासकांना घेता येत नाही. त्याच्यावर अभ्यास किंवा संशोधन करता येत नाही. वसंत सागर जलाशयाच्या अंतरंगात मासे, मगरी आणि इतर जलचर प्राण्यांचे स्वतंत्र विश्व. सर्व ऋतूमध्ये जलाशयाच्या काठावर आणि अभयारण्यातील वनसंपत्ती वरती शेकडो प्रकारचे पक्षी परदेशातून येतात.
संरक्षित क्षेत्रात प्रचितगड किल्ला आहे. त्यामुळे तिथे पर्यटकांना अभयारण्याच्या मार्गांनी जाता येत नाही नायरीमार्गे त्या गडावर जाता येते. चार जिल्ह्यांच्या सीमेवर हा प्रचितगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खजिना या किल्ल्यावर आहे. अत्यंत दुर्गम व चढण्यास कठीण असा किल्ला. टेहळणी किल्ला असा उल्लेख इतिहासात आहे. किल्ल्यावर भवानी पक्षी मंदिर, राजवाड्याचे अवशेष, तोफा आदी पाहता येते. गडावर चढण्यासाठी शिड्यांची सुविधा अलीकडच्या काळातील. अभयारण्यात वारणा नदी उगम पाथरपूंज येथे आहे. कंदार धबधबा प्रसिद्ध आहे. कलावंतीणीची विहीर आहे. भैरवगड, रामनदी ही ठिकाणे संरक्षित क्षेत्रामुळे पाहता मात्र येत नाहीत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जागतिक वारसा स्थळ (वल्ड हेरिटेज साईट) आहे. महत्त्वाचा पक्षी अधिवास आणि अतिसंवेदनशील जैवविविधतेसाठी हा प्रकल्प ओळखला जातो. जंगल, गवताळ प्रदेश आणि सडा असे तीन प्रकारात या प्रकल्पाचे वर्गीकरण केले जाते. जंगलातील काही डोंगर भागांची समुद्र सपाटीपासूनची उंची ही एक हजार मीटरपेक्षा जास्त आहे.
व्याघ्र प्रक ल्प – देशात एकूण – 54
महाराष्ट्र -5 मध्य व पूर्व – 4 प. महाराष्ट्र – 1
सह्याद्री प्रकल्पाची स्थापना 2010
एकूण जंगल क्षेत्र 1165.56 चौ. कि.
बफर झोन क्षेत्र 565.45 चौ. कि.
कोअर भाग 600 चौ. कि.
चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जाधववाडी तपासणी नाक्यापासून जंगलाच्या आतमध्ये झोळंबी विठलाई मंदिरापर्यंतचा मार्ग, तसेच उदगीर भागात दुसरा असे दोन पर्यटन मार्ग आहेत. या मार्गावर वन विभागाच्या गाडीतून पर्यटकांना सफारी करता येते. चांदोली राष्ट्रीय उद्यान हा घाट-कोकण भाग आहे. ते कराडपासून 55 कोल्हापूरपासून 80 आणि सांगलीपासून शंभर तर पुण्यापासून 217 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी येण्यासाठी नवा चांगला रस्ता उपलब्ध असल्यामुळे पर्यटकांना सहज येता येते. चांदोली पर्यटन क्षेत्रात उदगीर, उखळू, शितूर, मणदूर, आरळा, जाधववाडी ही गावे येतात.
जिल्हा – सांगली, तालुका – शिराळा
चांदोली राष्ट्रीय उद्यान क्षेत्र – 317 चौ. कि.
पक्ष्यांच्या प्रजाती- 300
सरपटणार्या प्राण्यांच्या प्रजाती – 60
उभयचर प्राण्यांच्या प्रजाती – 25
फुलपाखरांचे प्रकार – 125
इतर तृणभक्षक, मांसभक्षक प्रजाती – 36