पर्यटकांना देणार एमटीडीसी सोयी सुविधा | पुढारी

पर्यटकांना देणार एमटीडीसी सोयी सुविधा

खुलताबाद : मे महिन्याच्या शालेय सुट्ट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आखणी करत असून पर्यटकांना विविध सोयी आणि सवलती देणार आहे. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या २९ पर्यटक निवासी ३० उपहारगृहे एमटीडीसीच्या आहेत. सदरच्या पर्यटक निवासांपैकी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयांतर्गत सध्या सुरू असलेली चार पर्यटक निवास आहेत. पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशन जवळच असून या ठिकाणी ८० पेक्षा जास्त सर्व सुविधांयुक्त अशा ८० अधिक खोल्या उपलब्ध आहेत. तसेच प्रशस्त वाहनतळ आणि उपहारगृहाची ही सोय आहे.

वेरूळ लेणीच्या पायथ्याशी नव्यानेच तयार होत असलेले सर्व सुविधांयुक्त पर्यटक निवास हे आकारणास येत असून या ठिकाणीही २२ सुटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत सुरू होत असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.
आगामी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांची जोरदार नोंदणी सुरू आहे. महामंडळानेही सुट्ट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी तयारी केली आहे. पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी जपत आजी- माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती उपलब्ध आहेत. वीस खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलीसाठीही विशेष सवलती देत असल्याचे हरणे यांनी सांगितले.
पर्यटकांसाठी वाचनालय सुरू देखील करण्यात आले आहे.

प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात येत आहे. आगामी काळात डेस्टिनेशन वेडिंग, प्री-
वेडिंग फोटोशूट, रिसेप्शन फोटोशूट, कॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि वर्क फ्रॉम नेचर यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या शाळा, महाविद्यालयांन सुट्या असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यांना अधिकाअधिक सुविधा उपलब्ध झाल्या तर पर्यटन व्यवसाय वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे.

Back to top button