

पुढारी ऑनलाईन डेस्क: UPI outage | युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पुन्हा डाऊन झाले आहे. या सेवेमध्ये व्यत्यय आला आहे. भारतातील अनेक युपीआय युजर्संना आज (दि.१२) डिजिटल पेमेंट्स करताना अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर नोंदवल्या आहेत.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये (UPI) आज मोठ्या प्रमाणात बिघाड झाला. ज्यामुळे Paytm, PhonePe आणि Google Pay सारखे लोकप्रिय अॅप्स वापराताना युजर्संना अडचण आली. ऑनलाईन पेमेंटसाठी UPI युजर्संना दैनंदिन व्यवहारांमध्ये व्यत्यय आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
आजकाल बहुतांश लोक स्थानिक खरेदी, बिल पेमेंट आणि मनी ट्रान्सफरसह दैनंदिन पेमेंटसाठी UPIवर अवलंबून आहेत. युपीआय सेवा ठप्प झाल्याने अनेकांसाठी या समस्येमुळे गोंधळ निर्माण झाला. या बिघाडाची मोठ्या प्रमाणात तक्रार करण्यात आली.
डिजिटल पेमेंट्समधील व्यत्ययामुळे डाउनडिटेक्टरवरील तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली, जे ऑनलाइन सेवा समस्यांचा मागोवा घेणारे प्लॅटफॉर्म आहे. या साइटनुसार, दुपारी १२ च्या सुमारास तक्रारींची संख्या १,२०० हून अधिक झाली. सुमारे ६६ टक्के UPI युजर्संनी सांगितले की, त्यांना पेमेंट करण्यात समस्या येत आहेत. तर ३४ टक्के UPI युजर्संनी निधी हस्तांतरणात समस्या येत आहेत. या बिघाडामुळे विविध बँका आणि प्लॅटफॉर्मवरील युजर्सवर परिणाम झाला. ज्यामुळे UPI पायाभूत सुविधांमध्ये व्यापक नेटवर्क समस्या असल्याचे दिसून आले.
युपीआय बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, युजर्स जलद समस्या निराकरणाची आशा बाळगत आहेत. आतापर्यंत, NPCI किंवा प्रमुख UPI प्लॅटफॉर्मकडून कारण किंवा निराकरणाच्या वेळेबद्दल कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. सेवा पूर्णपणे पुनर्संचयित होईपर्यंत तज्ज्ञांकडून युजर्संना पर्यायी पेमेंट पद्धती वापरण्यास सांगितले जात आहे.
UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (NPCI) विकसित केलेली एक लोकप्रिय इन्स्टंट पेमेंट सिस्टम आहे. जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली चालते. ती युजर्संना NPCI कडून कोणतेही शुल्क न घेता मोबाइल ॲप्सद्वारे बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरित करण्याची सेवा पुरवतात.