

नवी दिल्ली : देशातील डिजिटल पेमेंट विश्वात क्रांती घडवणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफे (UPI) प्रणालीमध्ये आजपासून (दि.१६) मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल लागू झाले आहेत. १६ जूनपासून अमलात आलेल्या या नवीन नियमांमुळे UPI द्वारे होणारे व्यवहार आता अधिक जलद आणि सुरक्षित होणार असून, पेमेंट प्रक्रियेचा वेग जवळपास दुप्पटीने वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कोट्यवधी UPI युजर्संना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोबाइल बँकिंग आणि डिजिटल पेमेंटच्या युगात UPI ने भारतीयांच्या दैनंदिन व्यवहारांना प्रचंड सोपे केले आहे. केवळ काही क्लिकवर पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सुरक्षितपणे पाठवता येतात. आता या प्रक्रियेला आणखी गती मिळणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) या बदलांची घोषणा यापूर्वी एप्रिल महिन्यात केली होती, आणि त्यानुसार हे नवीन नियम आजपासून देशभरात लागू करण्यात आले आहेत
प्रतिसाद वेळेत मोठी कपात : नवीन नियमांनुसार, UPI व्यवहाराच्या रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स टाइममध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे. पूर्वी जिथे व्यवहाराला ३० सेकंदांपर्यंतचा वेळ लागत होता, तो आता केवळ १० सेकंदांवर आणण्यात आला आहे. यामुळे पेमेंट फेल होण्याचे प्रमाण देखील कमी होण्याची अपेक्षा आहे.
जलद पडताळणी आणि परतावा : लाभार्थीच्या वैध पत्त्याची पडताळणी (validation) करण्यासाठी लागणारा वेळ १५ सेकंदांवरून १० सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच, कोणताही व्यवहार रद्द करायचा असल्यास किंवा पैसे परत मिळवण्याची प्रक्रियाही आता केवळ १० सेकंदात पूर्ण होणार आहे.
एनपीसीआयने स्पष्ट केले आहे की, हे नवीन बदल प्रभावीपणे लागू करण्यासाठी सर्व बँका आणि UPI सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना (जसे की PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी) आपापल्या सिस्टीममध्ये आवश्यक ते अपडेट्स करणे बंधनकारक आहे. यामुळे ग्राहकांना सुधारित आणि वेगवान सेवेचा अनुभव घेता येऊ शकेल.
बॅलन्स तपासण्याची मर्यादा : युजर्सना आता दररोज ५० वेळा आपल्या खात्यातील बॅलन्स तपासण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच, आपल्या मोबाइल क्रमांकाशी लिंक असलेल्या विविध बँक खात्यांची यादी पाहण्यासाठी दररोज २५ संधी उपलब्ध असतील.
ऑटो-पेमेंट (Mandate) नियमांत बदल : प्रत्येक ऑटो-पेमेंट मँडेटसाठी आता केवळ एकच संधी असेल. व्यवहार अयशस्वी झाल्यास, तो पुन्हा करण्यासाठी ३ वेळा संधी मिळेल. तथापि, हे नियम पीक अवर्समध्ये (सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९:३०) लागू होणार नाहीत.
एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२५ पासून UPI प्रणालीमध्ये आणखी काही अतिरिक्त आणि सुधारित सेवा व अटी लागू केल्या जाणार आहेत. या सर्व बदलांमुळे UPI व्यवहार अधिकाधिक युजर्स फ्रेंडली, सुरक्षित आणि वेगवान बनण्यास मदत होणार आहे. या नवीन नियमांमुळे डिजिटल भारताच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे, असेच म्हणावे लागेल.