

Tesla Cybertruck India
सुरत : इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचा बहुचर्चित सायबर ट्रक अखेर भारतात दाखल झाला असून, तो गुजरातमधील सुरत शहरात पोहोचला आहे. या ट्रकची ऑर्डर प्रसिद्ध हिरे व्यावसायिक लवजी दलिया यांनी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात सायबर ट्रकचे मालक होणारे ते पहिले ग्राहक ठरले आहेत.
लवजी दलिया यांनी त्यांच्या उद्योगसमूहाचे नाव ‘गोपिन’ ट्रकला दिले आहे. ट्रकची किंमत सुमारे ७० हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ६० लाख रुपये आहे, अशी माहिती मिळाली आहे. या ट्रकची प्रथम दुबईत नोंदणी झाली असून, त्यानंतर मुंबईमार्गे सुरतला पोहोचविण्यात आला आहे.
भारतामध्ये टेस्लाचा सायबर ट्रक आला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, या ट्रकची ऑर्डर कोणी दिली, हे स्पष्ट झाले नव्हते. अखेर सुरतमध्ये ट्रक दाखल झाल्यानंतर लवजी दलिया उर्फ ‘लवजी बादशहा’ यांनी हा ट्रक मागवल्याचे उघड झाले.
सायबर ट्रकची रचना आणि वैशिष्ट्ये यामुळे तो जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची अनोखी डिझाईन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बळकट संरचनेमुळे तो लोकप्रिय ठरला आहे. लवजी दलिया यांनीही हा ट्रक त्यांच्या उद्योगसमूहासाठी खास ओळख निर्माण करण्यासाठी घेतल्याचे सांगितले जात आहे.
सध्या सायबर ट्रक सुरतमध्ये दाखल झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि ऑटोमोबाईल प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. ट्रक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत. भारतात टेस्लाची अधिकृत विक्री अद्याप सुरू झालेली नसली, तरी लवजी दलिया यांच्या माध्यमातून टेस्लाचा हा प्रतिष्ठित सायबर ट्रक देशात प्रथमच प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. यामुळे भारतात टेस्लाच्या आगमनाबाबत नवीन चर्चांना उधाण आले आहे.