

कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालणार्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा फरार संचालक विजय जोतिराम पाटील (रा. लाखे गल्ली, शिंदेवाडी, ता. करवीर) याच्या मालकीची 70 लाख रुपये किमतीची आलिशान मोटार पोलिसांनी पुण्यातून जप्त केली.
शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, पुण्यासह सात राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. शाहूपुरी पोलिसांत कंपनीचे पदाधिकारी, संचालक व एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी 18 जणांना अटक झाली असून कंपनीच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वाचा सहभाग असलेला संशयित विजय पाटील तीन वर्षांपासून फरार आहे. पोलिसांच्या पथकांना तो सापडला नाही म्हणून त्याची स्थावर मालमत्ता जप्त करून त्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. विजय पाटीलची 70 लाखापेक्षा अधिक किमतीची मोटार पुण्यातील मुंढवा परिसरातून गुरुवारी पहाटे जप्त करण्यात आली.