Intel Layoffs 2025: इंटेलमध्ये 'बिग रिसेट', तब्बल 25 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, CEO चे संकेत

टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंटेल (Intel) एका मोठ्या आर्थिक आणि संरचनात्मक बदलाच्या तयारीत आहे
Intel Layoffs 2025
Intel Layoffs 2025Pudhari Photo
Published on
Updated on

सॅन फ्रान्सिस्को: टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंटेल (Intel) एका मोठ्या आर्थिक आणि संरचनात्मक बदलाच्या तयारीत असून, कंपनीने तब्बल २५ हजार कर्मचारी कमी करण्याची योजना आखली आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या अहवालानुसार, चिप निर्मितीतील आपले वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कंपनी हा 'बिग रिसेट' करत आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.

Intel कर्मचाऱ्यांची संख्या 75 हजारांवर आणणार

कंपनीचे उद्दिष्ट २०२५ च्या अखेरपर्यंत कर्मचारी संख्या १ लाख ८ हजार ९००वरून कमी करून ७५ हजारांपर्यंत आणण्याचे आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या कामकाजावर आणि भविष्यातील योजनांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

कंपनी तोट्यात, CEOने दिले बदलाचे संकेत

Intelने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक अहवालांमध्ये कंपनीला २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २.९ अब्ज डॉलर्सचा निव्वळ तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच अहवालात कंपनीने कर्मचारी कपातीच्या वृत्ताला दुजोरा दिला. कंपनीचे नवे सीईओ लिप-बू टॅन यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सध्याच्या कठीण परिस्थितीची कबुली दिली. ते म्हणाले, "मला माहित आहे की, मागील काही महिने सोपे नव्हते. आम्ही कंपनीला अधिक कार्यक्षम आणि प्रत्येक स्तरावर जबाबदार बनवण्यासाठी कठीण पण आवश्यक निर्णय घेत आहोत."

एकेकाळचा 'किंग' स्पर्धेत मागे का पडला?

एकेकाळी पर्सनल कॉम्प्युटर (PC) युगात मायक्रोप्रोसेसर बाजारावर एकहाती वर्चस्व गाजवणारी इंटेल (Intel) अलिकडच्या वर्षांत स्पर्धेत मागे पडली आहे. स्मार्टफोनच्या क्रांतीकडे दुर्लक्ष करणे आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चिपच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत एनव्हिडिया (Nvidia) सारख्या कंपन्यांच्या मागे पडणे, ही इंटेलसाठी मोठी आव्हाने ठरली आहेत. गुंतवणूकदारांची मुख्य चिंता इंटेलच्या '18A' नावाच्या नवीन उत्पादन प्रक्रियेच्या कामगिरीबद्दल आहे. ही टेक्नॉलॉजी इंटेलला तैवानच्या TSMC सारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या बरोबरीने आणेल, असा दावा पूर्वी केला जात होता. मात्र, आता कंपनीने असे दावे करणे थांबवले आहे.

Intelचे कर्मचारी कपातीसोबतच इतर मोठे निर्णय

सीईओ लिप-बू टॅन यांनी स्पष्ट केले, "पुरेशी मागणी नसताना कंपनीने खूप लवकर आणि खूप जास्त गुंतवणूक केली. यामुळे आमच्या फॅक्टरीचे जाळे अनावश्यकपणे विखुरले गेले आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर झाला नाही. आता आम्हाला आमची दिशा सुधारली पाहिजे, असे म्हटले आहे. खर्च कमी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून इंटेलने इतरही मोठे निर्णय घेतले आहेत यामध्ये;

  • नवीन फॅक्टरी योजना रद्द: जर्मनी आणि पोलंडमधील नवीन फॅक्टरी उभारण्याचे काम थांबवण्यात आले आहे.

  • बांधकामाचा वेग कमी: अमेरिकेतील ओहायो येथील प्रकल्पाच्या बांधकामाचा वेग कमी केला जाईल.

  • ऑपरेशन्सचे स्थलांतर: कोस्टा रिकामधील काही ऑपरेशन्स व्हिएतनाम आणि मलेशियामध्ये हलवून एकत्रीकरण केले जाणार आहे.

कंपनीची पुढील वाटचाल आणि आव्हाने

इंटेल आता '14A' नावाच्या पुढील पिढीच्या चिप प्रक्रियेची योजना आखत आहे. मात्र, यावेळी बाहेरील ग्राहकांकडून पक्की ऑर्डर मिळाल्याशिवाय नवीन फॅक्टरी उभारली जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या इंटेलचा शेअर सततच्या तोट्यामुळे आणि स्पर्धकांच्या तुलनेत कमी नाविन्यपूर्णतेमुळे दबावाखाली आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी आणि AI चिप्सच्या बाजारपेठेत आपला गमावलेला हिस्सा परत मिळवण्यासाठी कंपनीला उत्पादन प्रक्रियेत जलद प्रगती दाखवावी लागेल, असे मत उद्योग विश्लेषक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news