

रक्त तपासणी ही कोणतीही आजार ओळखण्यासाठीचा एक महत्त्वाचा आणि सोपा मार्ग आहे. मात्र आता, भारतात एक नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, ज्यामुळे सुई न वापरता आणि रक्त न काढता तपासणी करता येईल. हे भारतातील पहिले AI आधारित ब्लड टेस्टिंग टूल आहे.
या नव्या पद्धतीत, व्यक्तीला फक्त उजेड असलेल्या खोलीत बसवून त्याचा चेहरा स्कॅन केला जातो. फक्त २० सेकंदात त्याला रक्तदाब (ब्लड प्रेशर), हृदयगती (हार्ट रेट), हीमोग्लोबिन लेव्हल, ऑक्सिजन पातळी आणि तणाव पातळी (स्ट्रेस लेव्हल) यांची माहिती मिळते.
हे तंत्रज्ञान पहिल्यांदा हैदराबादच्या निलोफर शासकीय रुग्णालयात वापरात आणण्यात आले. तेथील मॅटर्निटी वॉर्डमध्ये गर्भवती महिलांमध्ये आयरनच्या कमतरतेचं (अॅनिमिया) वेळीच निदान करण्यात यश मिळालं.
या AI अॅपला लवकरच महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर दूरदराजच्या आदिवासी भागांमध्येही याचा विस्तार केला जाणार आहे. अशा भागांमध्ये रक्त तपासणी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक अडचणी आहेत, त्यामुळे हे अॅप फार उपयोगी ठरणार आहे.
एकल वापरकर्त्यासाठी असलेल्या अॅपचं नाव QuickVitals आहे, तर सरकारी रुग्णालयांमध्ये वापरासाठी तयार करण्यात आलेल्या मल्टी-यूजर अॅपचं नाव आहे ‘अमृत स्वस्थ भारत’. या अॅपमध्ये फक्त एका मिनिटात आरोग्य तपासणी होते.
या अॅपमध्ये Photoplethysmography (PPG) नावाचं तंत्रज्ञान वापरलं जातं. यामध्ये त्वचेवर प्रकाश टाकून त्यातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या सिग्नल्सवरून शरीरातील रक्ताभिसरणाची माहिती घेतली जाते.
बिसम फार्मास्युटिकल्सचे संस्थापक हरीश बिसम यांनी सांगितले की, "लाइट जेव्हा त्वचेवरून आत प्रवेश करते, तेव्हा तिचा काही भाग परत परावर्तित होतो. हे परावर्तित प्रकाश फोनचे सेन्सर्स पकडतात आणि नंतर अॅपमधील AI अल्गोरिदम्स त्याचे विश्लेषण करतात."
संपूर्ण देशात आरोग्यसेवा अधिक जलद, अचूक आणि प्रवेशयोग्य करण्यासाठी हे AI आधारित ब्लड टेस्टिंग अॅप एक मोठं पाऊल आहे. भविष्यात, या अॅपच्या मदतीने ग्रामीण आणि गरीब भागांमध्ये आरोग्याची काळजी घेणं अधिक सुलभ होणार आहे.