पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲपलनंतर आता गुगलने भारतात आपले स्मार्टफोन बनवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत Pixel 8 चे उत्पादन सुरू केले आहे. गेल्या वर्षी गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये कंपनीने याची घोषणा केली होती. आता कंपनीने त्यांच्या पहिल्या मेड इन इंडिया Google Pixel 8 स्मार्टफोनचे उत्पादन सुरू केले आहे.
कंपनी आपले नवीन पिक्सेल स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणि जागतिक बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. यात फोल्डिंग फोनचा देखील समावेश आहे. गुगल पहिल्यांदाच फोल्डिंग फोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. यासाठी गुगलने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानले आहेत.
यापूर्वी असा अंदाज वर्तवला जात होता की Pixel 8 चे उत्पादन या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सुरू होईल. भारत सरकार देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याआधी ॲपलने मोठे पाऊल उचलत मेड इन इंडिया ॲपल स्मार्टफोनची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. कंपनी आता त्यांचे लेटेस्ट फोन्ससुद्धा भारतात बनवत आहे.
त्याचबरोबर गुगलचे उत्पादन सुरू झाल्याने कंपनी भारतीय बाजारपेठेबाबत काय विचार करत आहे हेही स्पष्ट झाले आहे. गुगलने अद्याप आपल्या स्थानिक निर्मात्याबद्दल माहिती दिलेली नाही. अलीकडेच, कंपनीने ऑफलाइन मार्केटमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि क्रोमासोबत भागीदारी केली आहे.
भारतात उत्पादन सुरू झाल्यानंतर त्याचा बाजारावर काय परिणाम होतो हेही पाहावे लागणार आहे. यादरम्यान, गुगल स्मार्टफोनच्या किमती कमी होणार की नाही हे लवकरच समजणार आहे.
Google Pixel फोन डिक्सन टेक्नॉलॉजीद्वारे भारतात तयार केले जाणार असल्याचे समजते आहे, पण कंपनीने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. कंपनी भारतात दर महिन्याला एक लाख स्मार्टफोन्स तयार करण्याचा विचार करत आहे. कंपनी 13 ऑगस्ट रोजी आपली Pixel 9 सीरिज जागतिक बाजारपेठेत लाँच करणार आहे. तर Fold मॉडेल 14 ऑगस्टला भारतीय बाजारात लॉन्च होईल.