

टेक न्यूज: कल्पना करा की तुमच्या गॅलरीमधील एखादा जुना फोटो अचानक जिवंत झाला, तुम्ही काढलेल्या चित्रातील पात्रे हलू-बोलू लागली किंवा एखाद्या शांत निसर्गचित्रात ढग वाहू लागले आणि नदीच्या पाण्याला खळखळाट आला. ही आता केवळ कल्पना राहिलेली नाही, तर प्रत्यक्षात उतरले आहे.
गूगलने आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉट जेमिनीमध्ये (Gemini) एक असे जबरदस्त फिचर आणले आहे, जे तुमच्या स्थिर फोटोंमध्ये अक्षरशः प्राण फुंकू शकते.
Googleने आपल्या सर्वात शक्तिशाली व्हिडिओ निर्मिती मॉडेल 'Veo' ला आता जेमिनी ॲपचा भाग बनवले आहे. या वर्षी मे महिन्यात झालेल्या गूगलच्या I/O इव्हेंटमध्ये या तंत्रज्ञानाची घोषणा करण्यात आली होती. आता 'इमेज-टू-व्हिडिओ' (Image-to-Video) या फिचरच्या माध्यमातून युजर्स केवळ एका फोटोच्या आधारे एक छोटा पण आकर्षक व्हिडिओ तयार करू शकणार आहेत.
गूगलने आपल्या जेमिनी ॲपमध्ये शक्तिशाली 'Veo' एआय मॉडेल जोडले.
आता एका स्थिर फोटोवरून ऑडिओसह 8 सेकंदांचा व्हिडिओ तयार करता येणार.
ही सुविधा 'जेमिनी ॲडव्हान्स्ड'च्या पेड युजर्ससाठीच उपलब्ध असेल.
हे फिचर काय आहे आणि ते कसे काम करते?
Google Geminiचे हे नवीन फिचर सध्या गूगलच्या प्रीमियम युजर्ससाठीच आहे. ज्या युजर्संनी जेमिनी ॲडव्हान्स्डचे (Gemini Advanced) सबस्क्रिप्शन घेतले आहे, ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. भारतात गूगल वन AI प्रीमियम प्लॅनसाठी युजर्संना दरमहा 1 हजार 950 खर्च करावे लागतील. या प्लॅनअंतर्गत, युजर्स दररोज प्रत्येकी 8 सेकंदांचे 3 व्हिडिओ क्लिप्स तयार करू शकतात, तेही ऑडिओसहित. Googleच्या मते, "या फिचरद्वारे तुम्ही दैनंदिन वस्तूंना ॲनिमेट करू शकता, तुमच्या चित्रांना आणि पेंटिंग्जला जिवंत करू शकता किंवा निसर्ग दृश्यांमध्ये हालचाल जोडू शकता."
हे तंत्रज्ञान कंटेंट निर्मितीच्या जगात एक मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते. आतापर्यंत व्हिडिओ बनवण्यासाठी विशेष कौशल्य आणि सॉफ्टवेअरची गरज भासत असे, पण जेमिनीसारख्या साधनांमुळे आता कोणताही सामान्य वापरकर्ता आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊ शकतो आणि केवळ एका फोटोतून एक संपूर्ण कथा मांडू शकतो.
हे फिचर वापरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:
तुमच्या फोनमध्ये जेमिनी ॲप उघडा.
प्रॉम्प्ट बॉक्समधील टूलबारमधून "व्हिडिओ" (Videos) हा पर्याय निवडा.
तुमच्या फोन गॅलरीमधून तुम्हाला हवा असलेला फोटो निवडा.
आता जेमिनीला टेक्स्ट प्रॉम्प्टद्वारे सूचना द्या. जसे की, तुम्हाला फोटोमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल हवी आहे, पार्श्वभूमीत काय बदल अपेक्षित आहेत किंवा व्हिडिओचा मूड कसा असावा.
काही क्षणांतच, जेमिनी तुमच्या त्या स्थिर फोटोला एका आकर्षक व्हिडिओमध्ये रूपांतरित करेल.