

आज जगभरात AI ची क्रेझ आहे. अनेकजण सल्ला, अभ्यास, वैयक्तित प्रश्न सोडवण्यासाठी चॅटजीपीटीचा (ChatGPT) मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. किम कार्दशियन या हॉलिवूड अभिनेत्रीने देखील कायद्याचा अभ्यास करताना हे नवीन तंत्रज्ञान वापरले, मात्र तिला AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ने मोठा झटका दिला आहे.
चॅटजीपीटीच्या (ChatGPT) चुकीच्या उत्तरांमुळे प्रसिद्ध हॉलीवूड सेलिब्रिटी किम कार्दशियन (Kim Kardashian) अनेक लॉ टेस्टमध्ये (Law Tests) नापास झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. तुम्ही देखील परिक्षेतील उत्तरे लिहण्यासाठी AI वापरताय, तर जाणून घ्या चॅटजीपीटीची (ChatGPT) दुसरी बाजू.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि विशेषतः चॅटजीपीटीसारख्या साधनांचा वापर अनेक लोक अभ्यास आणि परीक्षांच्या तयारीसाठी करत आहेत. मात्र, प्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटी किम कार्दशियन यांनी नुकताच केलेला खुलासा एआयच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभा करतो आहे.
एका टीव्ही शोदरम्यान किम कार्दशियन यांनी सांगितले की, कायद्याच्या अभ्यासाच्यावेळी त्यांनी ओपन एआयच्या चॅटजीपीटीचा वापर केला. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी आपल्या नोट्सचे फोटो चॅटजीपीटीला पाठवून उत्तरे विचारली. मात्र, चॅटजीपीटीने त्यांना दिलेली उत्तरे पूर्णपणे चुकीची होती, ज्यामुळे त्या अनेक टेस्टमध्ये (चाचण्यांमध्ये) नापास झाल्या. किम यांनी हसून सांगितले की, "मी त्याला (AIला) कायदेशीर सल्लागार म्हणून वापरते. पण, त्याने मला अनेकवेळा चुकीची उत्तरे दिली, ज्यामुळे मी Law च्या टेस्टमध्ये नापास झाले."
किम कार्दशियन 2019 पासून एका नॉन-ट्रेडिशनल प्रोग्रामद्वारे कायद्याचा अभ्यास करत आहेत. 2021 मध्ये त्यांनी 'बेबी बार एक्झाम' (Baby Bar Exam) उत्तीर्ण केली आणि या वर्षी मे महिन्यात त्यांची लॉ डिग्री पूर्ण झाली आहे. सध्या त्या बार कौन्सिल मेंबरशिपच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. चुकीच्या उत्तरांमुळे नापास झाल्यानंतरही, अखेरीस त्यांनी फायनल एक्झाम (अंतिम परीक्षा) मात्र पास केली.
किम कार्दशियन यांच्या या अनुभवामुळे पुन्हा एकदा हा महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे की, जगभरातील अनेक विद्यार्थी आणि व्यावसायिक अभ्यासासाठी एआयचा (AI) वापर करत असले तरी, या साधनांवर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. अनेक तज्ज्ञ सल्ला देतात की, संशोधन आणि अभ्यासासाठी एआयची मदत घ्यावी, पण एआयने दिलेल्या माहितीवर पूर्णपणे विश्वास न ठेवता त्याची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.