

लंडन : जगावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) संकट घोंघावत असल्याची चर्चा सुरू असताना, गुगलचे एक माजी उच्चाधिकारी मो गावदत यांनी एक धक्कादायक आणि गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, मानवी समाज लवकरच एका ‘विनाशकारी काळात’ (डायस्टोपिया) प्रवेश करणार आहे, जो तब्बल 15 वर्षे टिकेल. मात्र, या परिस्थितीला एआय जबाबदार नसेल, खुद्द ‘माणूसच’ असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मो गावदत, जे गुगलमध्ये 11 वर्षे कार्यरत होते आणि गुगलच्या सीक्रेट लॅब ‘गुगल एक्स’ चे चीफ बिझनेस ऑफिसर होते, त्यांनी ‘द डायरी ऑफ अ सीईओ’ या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये बोलताना हे भयावह भविष्य वर्तवले आहे. मो गावदत यांच्या मते, हा विनाशकारी आणि अराजकतेचा काळ 2027 पासून सुरू होईल आणि पुढील 12 ते 15 वर्षे, म्हणजेच 2040 ते 2042 पर्यंत टिकेल. या काळात आपल्याला एका अशा जगासाठी तयार राहावे लागेल जे पूर्णपणे अपरिचित असेल. आपण एका अल्पकालीन विनाशकारी काळातून जाणार आहोत.
या विनाशकारी काळात स्वातंत्र्य, जबाबदारी, मानवी नातेसंबंध, आर्थिक विषमता, सत्य आणि वास्तव, नवनिर्मिती आणि सत्ता यावर परिणाम होईल. या परिणामांना एआय तर माणूसच कारणीभूत असेल. या काळात खरा धोका हा मानवतेच्या ढासळत्या नैतिकतेचा आहे. वाईट प्रवृत्तीचे लोक जी माणसेच असतील, मशिन नव्हे, एआयचा वापर अत्यंत चुकीच्या कामांसाठी करतील. यामध्ये नागरिकांना फसवणे, त्यांच्या गोपनीयतेवर हल्ला करणे, त्यांचे पैसे लुटणे आणि समाजात गोंधळ निर्माण करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल.
एआयमुळे नवीन नोकर्या निर्माण होतील, ही कल्पना ‘शंभर टक्के बकवास’ आहे, असे गावदत यांनी म्हटले आहे. एआय प्रत्येक कामात माणसापेक्षा सरस ठरेल, अगदी कंपनीचा सीईओ बनण्यापर्यंत आपण जे काही निर्माण करतो, ते सर्व काही एआय तयार करू शकेल.
15 वर्षांच्या विनाशकारी काळानंतर एक ‘आदर्श समाज’ (युटोपिया) उदयास येईल, जिथे सर्व काही जवळपास परिपूर्ण असेल. पण, त्याआधी समाजाला या मोठ्या आणि कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे गावदत सांगतात.