

जागतिक स्तरावरील स्मार्टफोन कंपनी ऍपल (Apple) कंपनीने आपल्या आगामी आयफोन १७ (iPhone 17) सीरिजच्या लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनी ९ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील ऍपल पार्क येथे एका भव्य कार्यक्रमात चार नवीन मॉडेल्स- आयफोन १७ (iPhone 17) , आयफोन १७ एअर (iPhone 17 Air) , आयफोन १७ प्रो (iPhone 17 Pro) आणि आयफोन १७ प्रो मॅक्स (iPhone 17 Pro max) सादर करणार आहे.
iPhone-17 सीरीज लॉन्चच्या आधीच 'मॅकरूमर्स'च्या एका रिपोर्टने तंत्रज्ञान विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. रिपोर्टनुसार, ऍपल काही निवडक आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आयफोन १७ सीरिजचे (iPhone 17) मॉडेल्स केवळ ई-सिम (e-SIM) सपोर्टसह लॉन्च करू शकते, याचा अर्थ या फोन्समध्ये फिजिकल सिम कार्ड स्लॉट नसणार असल्याचेही समोर आले आहे.
हे बदल प्रामुख्याने युरोपियन देशांमध्ये दिसून येतील असे सांगितले जात आहे, जिथे Apple कंपनीने आपल्या अधिकृत रिटेलर्सना ई-सिम सपोर्टेड आयफोन मॉडेल्सची ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि नेदरलँड्ससारख्या देशांतील कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ऍपलच्या 'SEED' ॲपद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे. ऍपलने अमेरिकेत आयफोन १४ सीरिजपासूनच फिजिकल सिम स्लॉट काढायला सुरुवात केली होती. आता हाच प्रयोग मोठ्या प्रमाणावर इतर देशांमध्येही राबवण्याची कंपनीची तयारी आहे. या बदलामुळे ऍपलला फिजिकल सिम कार्ड स्लॉट बनवण्याचा खर्च वाचणार आहे. तसेच, ई-सिम तंत्रज्ञान फिजिकल सिमपेक्षा अधिक सुरक्षित मानले जाते, कारण फोन चोरीला गेल्यास ई-सिम काढता येत नाही.
भारतासारख्या देशांमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. भारतात अजूनही फिजिकल सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे ऍपल भारतात फिजिकल आणि ई-सिम दोन्हीचा सपोर्ट देण्याची शक्यता आहे. भारतीयांना एकदम ई-सिमवर स्विच करणे सोपे नाही, हे लक्षात घेऊन कंपनी हा निर्णय घेऊ शकते. या नव्या सीरिजच्या किमतीतही वाढ अपेक्षित आहे. रिपोर्टनुसार, आयफोन १७ प्रोची (iPhone 17 Pro) किंमत सुमारे 88 हजार रुपये आणि आयफोन १७ प्रो मॅक्सची (iPhone 17 Pro max) किंमत सुमारे 1 लाख, 5 हजार रुपये असू शकते. उत्पादन खर्च आणि इतर शुल्कांमधील वाढ हे या किंमती वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.