आपण नेहमी अनुभवतो की भर दुपारी एखाद्या वृक्षाच्या अल्हाददायक सावलीत क्षणभर जरी विसावलो, तरी शरीराला गारवा आणि मनाला शांतता मिळते. पण त्या सावलीला काही मर्यादा असतात. सूर्याच्या स्थानानुसार तिची दिशा बदलत राहते. पावसाळ्यात सूर्य दर्शन नसेल तर सावलीही नसते, आणि वृक्षच उन्मळून पडला, तर त्याची सावलीही नाहीशी होते.
गुरुकृपेच्या सावलीला ही बंधने नसतात. ती कमी जास्त होत नाही. तिला स्त्री-पुरुष, गरीब- श्रीमंत व ज्ञाती व्यवस्थेचा अडसर नसतो. ती सर्वांसाठी सारखी, कायम असते. श्री गुरु शरीराने असोत किंवा नसोत ही सावली कायम सोबत करते. आपल्या भक्तापाठी गुरु कसा सावलीसारखा पाठीराखा असतो याचं सुंदर उदाहरण समर्थ रामदास स्वामी आणि जयरामस्वामी यांच्या जीवनात दिसतं.
मिरजेचा ठाणेदार दिलालखान जयरामस्वामींना म्हणाला, “कल आपने कहा, के साधू का मिलाप घडीभर होने से राम का दर्शन होता है l मै आपकी खिदमत मे चार घंटे तक रहूंगा l मुझे राम दर्शन होना चाहिएl”
जयराम स्वामी म्हणाले, “असे एकदम दर्शन कसं होईल? माझ्या बोलण्याचा अर्थ असा की, साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे माणसाने भजन पूजन केले, वर्तन शुद्ध ठेवले, मन निर्मळ राखले म्हणजे त्याला देवाचे दर्शन होते”.
खान म्हणाला, “वो सब मुझे नही बताना l मुझे राम दर्शन होना चाहियेl नही तो मै आपको मुस्लिम बनाऊंगाl” मोठी कठीण परिस्थिती आली. हे वृत्त एका शिष्य करवी जयराम स्वामींनी समर्थांच्या कानी घातले. समर्थ कचेरीत प्रकट झाले.
“स्वामींनी कीर्तनात सांगितल्या प्रमाणे आम्हाला रामाचे दर्शन करून दिले नाही तर ते आमचे बंदी होतील.” खान म्हणाला. समर्थ म्हणतात, “तुम्हाला राम दर्शन पाहिजे एवढेच ना खानसाहेब? ते आम्ही करवतो. मात्र तुम्ही आमच्या मागे आम्ही जाऊ त्या मार्गाने आले पाहिजे”.
“ क्यो नही? आप फर्माईये, मै जरूर आऊंगा उस रास्ते से !चलीये l”
समर्थ तटावरच्या बंदूक मारण्याच्या लहानशा भोकाजवळ उभे राहून म्हणाले’
“या मार्गाने पलीकडे जायचे आहे.”
“या छिद्रातून ?” खानाने मोठ्याने हसत विचारले. त्याला वाटले हा उंचा पुरा भरदार फकीर या छोट्याशा छिद्रातून जाणार तरी कसा? परंतु त्याचा हसणे थांबण्याच्या आतच समर्थ त्या जंगीतून बाहेर गेले सुद्धा! समर्थ रामदासांसारख्या महायोग्याच्या पायाशी अष्टसिद्धी हात जोडून उभ्या असताना त्यांना आणिमा सिद्धीने ती जंगी पार करणे कठीण का होते?
“जयरामा अरे विचार कसला करतोस? ये ना तू ही पलीकडे !” “अlज्ञा महाराज” असे म्हणत जयराम स्वामींनी डोळे मिटले. आणि गुरुकृपेने गुरुभक्तीच्या बळावर तेही पलीकडे गेले. खान हे सगळं अवाक होऊन बघत होता. “ही माणसं की सैतान?” “या, खानसाहेब, आमच्या वाटेने तुम्हीही या. हा बघा राम आमच्या शेजारी उभा आहे. या आणि दर्शन घ्या.”
समर्थांचे हे शब्द ऐकताच खानाच्या सर्वांगाला कंप सुटला. अंतकरणात विलक्षण खळबळ माजली. तो तिथेच स्फुंदून स्फुंदून रडू लागला. पश्चात्तापाने खानाला पुन्हा पुन्हा दुःखाचा उमाळा येत होता. समर्थांचे पाय धरून तो म्हणाला, “मला आपल्या धर्मात घ्या हिंदू धर्माची दीक्षा द्या.” समर्थांनी त्याला मना केले.
“तुम्हारा धर्मही तुम्हारा कल्याण करेगा lस्वयं खुदा बन जानाl”असा उपदेश केला. समर्थांनी मिरजेच्या त्या किल्ल्यात हाती द्रोणागिरी घेतलेल्या भव्य मारुतीची स्थापना केली. (संदर्भ: वेणास्वामी : मृणालिनी जोशी.)
जयराम स्वामींवर गुरुकृपा झाली.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात-
मूळ सिंचने सहजे । शाखा पल्लव संतोषिती ॥
झाडाच्या मुळाला पाणी घातलं की संपूर्ण वृक्ष बहरतो. तसंच सद्गुरूंच्या चरणी मनापासून समर्पित झालं की साधनेचा मार्ग आपोआप खुला होत जातो. गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी माझ्या श्रीगुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना-ही गुरुकृपेची सावली आयुष्यभर माझ्या पाठीशी राहो आणि ती जपण्याइतकी अखंड साधना माझ्याकडून घडत राहो.
- सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे