Psychology of luck: काही लोकांना वारंवार नशीबाची साथ का मिळते?

काही लोकांना आयुष्यात सतत यश मिळते, तर काहींना वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो. अनेकदा यामागे 'नशीब' कारणीभूत असल्याचे मानले जाते.
Psychology of luck
Psychology of luckfile photo
Published on
Updated on

Psychology of luck

नवी दिल्ली: काही लोकांना आयुष्यात सतत यश मिळते, तर काहींना वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो. आपण अनेकदा यामागे त्याच नशीब आहे, असे मानतो. मात्र, मानसशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड वाईजमन यांच्या संशोधनानुसार नशीब ही केवळ दैवाची देणगी नसून, ती आपल्या विचारसरणी, सवयी आणि संधी ओळखण्याच्या क्षमतेशीही संबंधीत असते.

नशीब हे नेहमीच गूढ, अनपेक्षित आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असल्याचे मानले जाते. मात्र, मानसशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड वाईजमन यांनी स्वतःला कायम नशीबवान आणि स्वतःला सतत दुर्दैवी समजणाऱ्या लोकांचा अभ्यास करून वेगळाच निष्कर्ष मांडला. त्यांच्या 'द लक फॅक्टर' या पुस्तकानुसार, नशीब हे केवळ दैवावर अवलंबून नसून व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, आजूबाजूच्या संधींकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यावर कृती करण्याची तयारी यावरही अवलंबून असते. म्हणजेच, काही लोक जन्मतः नशीबवान नसतात, तर ते आपल्या वागणुकीतून आणि निर्णयांमधून अधिक संधी निर्माण करत असतात.

Psychology of luck
Psychology: प्रार्थना करताना अचानक रडू का येतं? जाणून घ्या ५ कारणे

वृत्तपत्रातील प्रयोगातून मिळाला मोठा धडा

डॉ. वाईजमन यांनी केलेला एक प्रसिद्ध प्रयोग या सिद्धांताला अधिक स्पष्ट करतो. या प्रयोगात सहभागी व्यक्तींना एक वृत्तपत्र देण्यात आले आणि त्यातील चित्रे मोजण्यास सांगितले. मात्र दुसऱ्या पानावर मोठ्या अक्षरांत लिहिले होते, "मोजणे थांबवा, या वृत्तपत्रात एकूण ४३ छायाचित्रे आहेत." पुढे आणखी एका पानावर लिहिले होते, "हा संदेश दिसल्यास प्रयोगकर्त्याला सांगा आणि २५० डॉलर जिंका."

आश्चर्याची बाब म्हणजे, स्वतःला दुर्दैवी समजणारे अनेक जण चित्रे मोजण्यात इतके गुंतले की त्यांना हे दोन्ही संदेश दिसलेच नाहीत. उलट स्वतःला नशीबवान समजणाऱ्या लोकांनी हे संदेश लगेच ओळखले.

या प्रयोगातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला, जे लोक एका उद्दिष्टात पूर्णपणे अडकून पडतात, ते अनेकदा त्यांच्या समोर असलेल्या नवीन संधींकडे दुर्लक्ष करतात. तर नशीबवान लोक आजूबाजूच्या प्रत्येक शक्यतेकडे अधिक जागरूकपणे पाहतात. वर्षानुवर्षांच्या मुलाखती, सर्वेक्षणे आणि प्रयोगांनंतर डॉ. वाईजमन यांनी स्वतःला नशीबवान समजणाऱ्या लोकांमध्ये चार समान गुण आढळले.

नशीबवान लोकांच्या चार महत्त्वाच्या सवयी

१. संधी स्वतः निर्माण करतात

नशीबवान लोक चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसत नाहीत. ते नवीन लोकांना भेटतात, सामाजिक संबंध वाढवतात आणि अनपेक्षित अनुभव स्वीकारण्यास तयार असतात. अनेक मोठ्या संधी या एखाद्या ओळखीमधून, संभाषणातून किंवा अचानक मिळालेल्या निमंत्रणातून निर्माण होतात. त्यामुळे मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या खुले असणाऱ्या लोकांना अधिक संधी मिळण्याची शक्यता असते.

२. अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवतात

डॉ. वाईजमन यांच्या संशोधनानुसार, नशीबवान लोक आपल्या अंतःप्रेरणेवर अधिक विश्वास ठेवतात. याचा अर्थ ते बेजबाबदार निर्णय घेतात असा नाही. उलट महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी ते शांतपणे विचार करतात आणि आपल्या अनुभवातून तयार झालेल्या अंतर्मनाच्या संकेतांकडे लक्ष देतात. अनेकदा ही अंतःप्रेरणा म्हणजे अनुभवातून विकसित झालेली वेगवान निर्णयक्षमता असते.

Psychology of luck
Psychology: प्रत्येक गोष्टीसाठी 'Thank You' म्हणणे शिष्टाचार की मानसिक दोष? मानसशास्त्र काय सांगते?

३. चांगल्या गोष्टींची अपेक्षा ठेवतात

नशीबवान लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा एक मोठा गुण आढळतो. त्यांना विश्वास असतो की परिस्थिती अखेर चांगली होईल. हा केवळ आशावाद नसून त्यामागे कृतीची ताकद असते. सकारात्मक परिणामाची अपेक्षा असल्यामुळे ते अधिक मेहनत घेतात, नवीन संधी स्वीकारतात आणि अपयशानंतर लवकर सावरतात. त्यांच्यासाठी एखादा वाईट दिवस म्हणजे संपूर्ण आयुष्य अपयशी ठरल्याचा अर्थ नसतो.

४. दुर्दैवातूनही शिकण्याचा प्रयत्न करतात

अडचण आली की नशीबवान लोक स्वतःवर दया करण्याऐवजी त्यातून काय शिकता येईल याचा विचार करतात. उदाहरणार्थ, एखादे विमान चुकले तर ते फक्त त्याचा त्रास न मानता, "यापेक्षा मोठी दुर्घटना टळली," असा सकारात्मक विचार करतात. अशा विचारसरणीमुळे संकटाचा मानसिक ताण कमी होतो आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची क्षमता वाढते.

प्रत्यक्ष आयुष्यात 'नशीब' याचा अर्थ काय?

जीवनातील प्रत्येक घटना आपल्या नियंत्रणात नसते. वाईट वेळ, अपघात किंवा अपयश टाळता येत नाही. मात्र, संधी ओळखण्याची क्षमता, सकारात्मक विचार, नवीन अनुभव स्वीकारण्याची तयारी आणि संकटातून लवकर सावरण्याची वृत्ती या गोष्टी आपल्या हातात असतात. नवीन लोकांशी संवाद साधणे, अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवणे आणि अपयशातून शिकणे या सवयी जोपासल्यास आयुष्यातील अनेक संधी ओळखणे सोपे होते.

म्हणूनच, नशीब हे केवळ आकाशातून पडणारे वरदान नसून, योग्य विचारसरणी आणि सवयींमधून विकसित होणारे एक कौशल्यही असू शकते. कदाचित नशीबवान असणे हे तुमच्यासोबत काय घडते यापेक्षा तुम्ही आयुष्य कसे जगता यावर अधिक अवलंबून असते.

Psychology of luck
Psychology of Lying: माणूस सर्वाधिक खोटं कधी बोलतो? वैज्ञानिक कारण माहीत आहे का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news